बनावट शिक्के, शिधापत्रिका, करपावत्या, आधार कार्ड जप्त

विविध गुन्ह्य़ातील आरोपींना जामीन मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेला जामीनदार आणि त्याचे बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या एका दलालाला अप्पर पोलीस आयुक्तांच्या पथकाने अटक केली आहे. त्याच्याकडून बनावट शिक्के, शिधापत्रिका, मालमत्ता कराच्या पावत्या, आधार कार्ड अशी अनेक बनावट दस्तऐवज जप्त करण्यात आले आहेत. रामआश्रय जैस्वार असे या दलालाचे नाव आहे.

न्यायालयात जामीन देण्यासाठी अंबरनाथ पूर्वेतील राहुल इस्टेट परिसरात राहणारा रामआश्रय जैस्वार (४६) हा बनावट कागदपत्रे तयार करत असल्याची माहिती अप्पर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांच्या पथकाला मिळाली होती. त्याआधारे त्यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक दीपक जाधव, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय आव्हाड यांनी रामआश्रय याला ताब्यात घेतले. या कारवाईमध्ये त्याच्याकडे शासनाचे बनावट शिक्के असलेल्या केशरी रंगाच्या तीन शिधापत्रिका, अंबरनाथ आणि उल्हासनगर महापालिकेच्या मालमत्ता कराच्या विविध पावत्या, आधारकार्ड अशी कागदपत्रे सापडली. ही कागदपत्रे तो वेगवेगळ्या न्यायालयात जामीन देण्यासाठी वापरणार होता, अशी माहिती चौकशीत पुढे आली. ही बनावट कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत. रामआश्रय हा कोणाकडून ही कागदपत्रे तयार करून घेत होता, बनावट सही शिक्के कुठे तयार केले आणि त्याचा वापर कोणाला जामीन देण्यासाठी केला, याचा तपास पोलीस करीत आहेत. या प्रकरणात आणखी कुणाचा सहभाग आहे का, याचाही शोध पोलीस घेत आहेत. याप्रकरणी रामआश्रय जैस्वारला अटक करण्यात आली आहे.