ठाणे पोलिसांची कारवाई; हजारो बनावट बिल्ले विकल्याचे उघड

रिक्षा, टॅक्सी तसेच बस अशी प्रवासी वाहने चालविण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून अधिवास प्रमाणपत्राशिवाय बिल्ले दिले जात नाहीत. मात्र, अधिवास प्रमाणपत्र नसलेल्या राज्यातील तसेच परराज्यातील चालकांना हेरून त्यांना बनावट बिल्ले विकणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटने अटक केली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील एक हजाराहून अधिक चालकांना त्याने आतापर्यंत असे बिल्ले विकल्याची बाब तपासात पुढे आली आहे. विशेष म्हणजे, दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली असून त्या दिशेनेही तपासाची चक्रे फिरवली आहेत.

शिवाजी रघुनाथ विचारे (४९) आणि रमेश किसन वाकले (५५) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. ठाण्यातील लोकमान्यनगर भागातील चिंतामणी इमारतीत शिवाजी राहत असून तो घरामध्येच बनावट बॅच तयार करून त्याची विक्री करत असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या वागळे युनिटला मिळाली होती. त्याआधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर व पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुधीर पाटील व शिवराज बेंद्रे यांच्या पथकाने शिवाजीच्या घरात धाड टाकली. त्यामध्ये रिक्षा, टॅक्सी तसेच बस चालविण्यासाठी आवश्यक पाच बनावट बॅच, बॅच साठी लागणारी व्हाईस मशीन, लोखंडी कैची, हॅक्सो ब्लेड, कानस, ड्रिल मशीन आणि पितळी पत्रा असा ऐवज सापडला.

दलालाची  नेमणूक

गेल्या तीन वर्षांपासून शिवाजी हा बॅच बनविण्याचे काम करत आहे. यापूर्वी त्याचा भागीदारीत प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय होता. काही कारणास्तव हा व्यवसाय बंद झाला. त्यानंतर त्याने बनावट बॅच बनविण्याचे काम सुरू केले. बॅच बनविण्याचे त्याने कुठेही प्रशिक्षण घेतलेले नाही. तरीही तो हुबेहूब बॅच तयार करून त्याची विक्री करीत होता. बॅच विकण्याच्या कामासाठी त्याने रमेश वाकले हा दलाल नेमला होता. वाशी, नेरुळ, पनवेल, बेलापूर, ठाणे, मुंबई परिसरातील रिक्षा थांब्यांवर रमेश रिक्षा पुसण्याचे काम करतो. त्यामुळे त्याची अनेक चालकांसोबत ओळख आहे. यातूनच तो बॅचसाठी ग्राहक शोधायचा. एक ते दोन हजार रुपयांमध्ये त्याने बॅचची विक्री केली आहे, अशी माहिती ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांनी दिली.

मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील ८०० ते १००० व्यक्तींना त्यांनी बनावट बॅच विकल्याची बाब तपासात पुढे आली आहे. दहावी पास नसल्यामुळे तसेच अधिवास प्रमाणपत्र नसल्यामुळे प्रादेशिक परिवहन विभाग रिक्षा, टॅक्सी तसेच बस चालविण्यासाठी आवश्यक असलेला बॅच देत नाही. त्यामुळे ज्यांना असे बॅच मिळत नाही अशा व्यक्तीना ते बॅच विकत होते. या व्यवसायातून त्यांना फार पैसे मिळत नव्हते. मात्र, दहशतवादी कारवायांच्या पाश्र्वभूमीवर हे प्रक*रण गंभीर असून त्या दिशेनेही तपास करण्यात येणार आहे.

-पराग मणेर, पोलीस उपायुक्त, ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा