ठाणे महापालिकेचा प्रस्ताव

ठाणे येथील पाचपाखाडी भागात तीन महिन्यांपूर्वी अंगावर झाड पडून मृत पावलेल्या किशोर पवार या तरुणाच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. ठाण्यातील दक्ष नागरिकांनी भर पावसात आंदोलन करून किशोर यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी केली होती. या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असला तरी ही मदत पुरेशी नाही, असा मुद्दा आता आंदोलकांनी पुढे आणला आहे.

ठाणे येथील पाचपाखाडी भागात किशोर पवार राहात होते. ठाणे न्यायालयामध्ये ते वकील म्हणून काम करीत होते. २१ जुलैला सकाळी शहरामध्ये सोसाटय़ाच्या वाऱ्यासह पाऊस सुरू होता. त्या दिवशी किशोर हे काही कामानिमित्त दुचाकीवरून जात असताना पाचपाखाडी भागातील गोविंद भुवन सोसायटीतील जीर्ण झालेले झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण विभागावर टीकेचा भडिमार सुरू झाला होता. तसेच महापालिकेच्या हलगर्जीपणामुळेच किशोर यांना आपले प्राण गमवावे लागल्याचा आरोप करत ठाण्यातील दक्ष नागरिकांची संघटना असलेल्या ठाणे मतदाता जागरण अभियानाने आंदोलन केले होते. या आंदोलनादरम्यान किशोर यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी करण्यात आली होती. या संदर्भात ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या पदाधिकाऱ्यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांचीही भेट घेतली होती. या भेटीमध्ये या मागणीचा गांभीर्याने विचार करून त्यासंबंधीचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी सादर करण्याचे आश्वासन आयुक्त जयस्वाल यांनी दिले होते. मात्र, गेल्या सर्वसाधारण सभेपुम्ढे यासंबंधीचा प्रस्ताव मान्यतेसाठी सादर करण्यात आला नसल्यामुळे ठाणे मतदाता जागरण अभियानाच्या कार्यकर्त्यांनी भर पावसात आंदोलन केले होते. दरम्यान, येत्या शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेपुढे यासंबंधीचा प्रस्ताव अखेर प्रशासनाने मान्यतेसाठी आणला आहे. त्यामध्ये किशोर यांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. मात्र, किशोर यांच्या पत्नीला महापालिकेत कायमस्वरूपी नोकरी देण्याची मागणी ठाणे मतदाता जागरण अभियानाकडून करण्यात आली असतानाही पालिकेने केवळ आर्थिक मदतीचा प्रस्ताव तयार केला आहे.