हरवलेल्या मतिमंद मुलीच्या वसईतील कुटुंबीयांचा शोध

वसई : दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या एका मतिमंद तरुणीच्या कुटुंबियांचा पोलिसांनी एका शब्दाच्या आधारे शोध घेतला. मीरा-भाईंदर आणि वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेने ही कामगिरी करून तिची आणि कुटुंबियांची भेट घडवून आणली.

चेंबूरच्या भिक्षेकरी गृहात एक ३० वर्षीय मतिमंद मुलगी गेली दोन वर्षे  राहत होती. बेपत्ता झाल्यानंतर ती या भिक्षागृहात आली होती. मात्र, मतिमंद असल्याने तिला स्वत:बद्दल काही सांगता येत नव्हते. या तरुणीवर केंद्रामार्फत वैद्यकीय उपचारही   करण्यात आले होते. पण ती केवळ ‘भारोळ’ हा एकच शब्द बोलू शकत होती. राज्य गुप्तचर विभागाच्या महिला पोलीस उपनिरीक्षक अनिता भगत यांना या तरुणीबाबत माहिती मिळाली. त्यांनी मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला याबाबत माहिती दिली. विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर पुकळे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांच्यावर ही कामगिरी सोपविण्यात आली.

गोसावी यांनी चेंबूर येथील भिक्षागृहात जाऊन त्या मतिमंद तरुणीची भेट घेतली आणि तिला बोलते करण्याचा प्रयत्न केला. मात्र ती कधी ‘पारोळ’ तर कधी ‘भारोळ’ असा घरचा अस्पष्ट पत्ता सांगत होती. त्या एका शब्दावरून तिचे कुटुंबिय शोधण्याचे अशक्यप्राय आव्हान गोसावी यांच्यापुढे होते. ‘पारोळ’ आणि ‘भारोळ’ ही गावे वसई तालुक्यात आहेत, याची माहिती गोसावी यांना होती. तेवढय़ा धाग्यावर गोसावी यांनी पुढील शोध सुरू केला. गोसावी यांनी या तरुणीचे छायाचित्र घेऊन ते पारोळ आणि भारोळ ही गावे पालथी घातली. अखेर भारोळ गावातील सरपंच बबन बरफ यांनी या तरुणीला ओळखले आणि  तिचे घर दाखवले. पोलिसांनी या तरुणीच्या आई वडिलांची भेट घेतली.

पोलिसांनी या मुलीच्या पालकांना चेंबूरच्या भिक्षागृहात नेले आणि हरवलेल्या मुलीची भेट घडवून आणली. लहानी वरखडा असे या तरुणीचे नाव आहे. २०१८ मध्ये ती घरातूनच बेपत्ता झाली होती. मतिमंद असल्याने तिला स्वत:बद्दल काहीच सांगता येत नसल्यामुळे ती दोन वर्षांपासून भिक्षागृहात राहत होती, असे भिक्षागृहाच्या अधिक्षिका पल्लवी ठाकरे यांनी सांगितले. ती तरुणी केवळ एक शद्ब बोलत होती. तो शब्द गावाचे नाव असावे, असा अंदाज लावून आम्ही शोध घेतला, आणि त्याला यश आले असे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक महेश गोसावी यांनी सांगितले.