साखरेचे खाणार त्याला देव देणार अशी म्हण आहे. या उक्तीचा प्रत्यय घेण्यासाठी प्रत्येक खवय्या उत्सुक असतोच. पारंपरिक पदार्थांसोबत केक हा पाश्चिमात्य पदार्थ लहानांपासून थोरांच्याही आवडीचा. अंडय़ाचा केक मागे पडत शुद्ध शाकाहारी केकलाही तितकीच मागणी आहे. हे सिल्व्हेस्टर लोपीस आणि जेकब लोपीस यांनी हेरले. बाजारात मिळणाऱ्या शाकाहारी केकवर त्यांनी आणखी प्रयोग करायला सुरुवात केली. यातूनच उगम झाला दह्य़ापासून तयार केलेल्या ‘एगलेस वाटी केक’चा. केकमधील दह्य़ाच्या वापराचे गुपित जाणून घेण्यासाठी एस के बेकरी अँड ड्रायफ्रुट्सला भेट द्याच.

स्वादिष्ट कप केक तयार करणं, त्यातही तो फुलवणं म्हणजे आव्हानच. अंडय़ाचा वापर केल्याशिवाय हा कपकेक फुलूच शकत नाही असा समज असतो. त्यामुळेच लोपीस यांनी अंडय़ाशिवाय कपकेक तयार करण्याचं कसब अवगत केलं. त्यातही त्यांनी दह्य़ाचा प्रयोग केला. असा केक वसईत कुठेच मिळणार नाही असा दावा लोपीस बंधूंनी केला आहे.

नंदाखाल येथे राहणाऱ्या लोपीस बंधूंचा वडिलोपार्जित ३० ते ३५ वर्षांपासून म्हशींचे दूध विकण्याचा व्यवसाय होता. त्यांच्या स्वत:च्या म्हशींच्या गोठय़ातून हे दुधउत्पादन केले जाई. या दुधापासून ते मिठाई आणि दुग्धजन्य पदार्थही तयार करत असत. या बंधूंनी १९७५मध्ये एस के बेकरी अँड ड्रायफ्रुट्स हे दुकान थाटले. आज या बेकरीत विविध प्रकारचे केक उपलब्ध आहेत. एगलेस वाटी केक हा त्यात सर्वात जास्त प्रसिद्ध आहे. त्याचसोबत मावा केक, अक्रोड केक, प्लम केक, खजूर-गाजर केक, मिक्स फ्रुट केक, स्लाईस केक आणि वाढदिवसाचे केकही उपलब्ध आहेत. या बेकरीतील पॅटिसची चव चांगलीच लक्षात राहते. त्यामुळे या पॅटिसला मोठय़ा प्रमाणावर मागणी असल्याचे लोपीस बंधू सांगतात.

त्यांच्या डेअरीमध्ये श्रीखंड, आम्रखंड, दही, लस्सी असे पारंपरिक पदार्थ मिळतात. त्यातही सीताफळ बासुंदी ही सर्वात प्रसिद्ध आहे. श्रीखंडामध्ये देखील ड्रायफ्रूट श्रीखंड, मँगो, केसर-इलायची श्रीखंड असे प्रकार येथे उपलब्ध आहेत. लोपीस यांच्याच गोठय़ातील दुधापासून हे पदार्थ तयार होत असल्याने चविष्ट आणि ताजे असतात. मिठाईच्या चोखंदळ खव्वयांनी तर लोपीस यांच्या दुकानाला भेट द्यायलाच हवी. मलाई बर्फी, मलाई पेढा, अंजीर पेढा, बटरस्कॉच पेढा असे प्रकार ऐकल्यावरच तोंडाला पाणी सुटते. घरगुती सोहळ्यासाठी या प्रकारांना विशेष मागणी असल्याचे लोपीस सांगतात.

दुकानात आस्वाद घेण्यासाठी मँगो, मलाई लस्सी तुम्हाला तृप्त करण्यासाठी सज्ज असते. पट्टी समोशाचाही आस्वाद येथे घेता येतो. या सर्व पदार्थाच्या गुणवत्तेची आम्ही स्वत: शहानिशा करतो याची खात्री लोपीस देतात.

एस के बेकरी अँड ड्रायफ्रुट्स

* पत्ता : एस के बेकरी अँड ड्रायफ्रुट्स, दुकान क्रमांक : ४, ठाकूर टॉवर, आगाशी रोड,  विरार पश्चिम

* वेळ : सकाळी ६.३० ते दु १. ०० आणि दुपारी ३.३० ते रात्री ९