News Flash

आमच्या स्वप्नातील डोंबिवली : सुंदर नको, पण सुस असावी!

प्रत्येक नागरिकाला आपलं शहर स्वच्छ, सुंदर असावं, असं वाटत असते.

प्रत्येक नागरिकाला आपलं शहर स्वच्छ, सुंदर असावं, असं वाटत असते. गचाळ, बोकाळलेलं, अस्वच्छ शहर कोणालाच आवडत नाही. त्यामुळेच निवडणूक काळात विविध राजकीय पक्ष,उमेदवार जेव्हा विविध कामांची आश्वासनं देतात, तेव्हा मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास निर्माण होतो. तो विश्वास कितपत सार्थ ठरतो, हा नंतरचा मुद्दा आहे. मात्र, आपलं शहर असं असावं, याबाबत प्रत्येक नागरिकाच्या मनात एक स्वप्नचित्र असतं. कल्याण-डोंबिवलीत राहणाऱ्या काही नामवंत मंडळींना शहराबद्दल काय वाटतं, हे जाणून घेणारे निवडणूक विशेष सदर.
पाच वर्षांतून एकदा येणारी कल्याण-डोंबिवली महापालिकेची निवडणूक येत्या ऑक्टोबर मध्ये होत आहे. पालिकेत सध्या विरोधी पक्षात असणाऱ्या पक्षांचा प्रभाव राज्यात फार कमी झाला आहे. तर पालिकेतील सत्ताधारी पक्षाच्या गेल्या २० वर्षांतील कामगिरीवर नागरिक नाराज आहेत. अशा गोंधळाच्या वातावरणात सर्वच राजकीय पक्ष आम्हा मतदारांना तोंडभर आश्वासने देतील व महापालिका क्षेत्रात स्वर्ग, नंदनवन आणण्याची व फुलवण्याची स्वप्ने नेहमीप्रमाणे दाखवतील. पण, डोंबिवलीच्या सद्य परिस्थितीचा विचार करता कोणत्याही पक्षाकडून फार मोठय़ा अपेक्षा बाळगणे चुकीचे ठरेल!
डोंबिवलीतील सर्वात मोठी समस्या आहे रस्ते व त्यांची दुर्दशा. पालिकेचा १५०० कोटीचा अर्थसंकल्प असूनही, कोटय़वधी रुपयांचा निधी रस्ते कामांसाठी खर्च होऊनही रस्ते चांगले होऊ शकत नाही हे न उलगडणारे कोडे आहे. अपेक्षेपेक्षा दुप्पट झालेल्या लोकसंख्येमुळे व भरमसाठ वाढलेल्या चारचाकी वाहनांमुळे रस्ते फारच अपुरे पडतात. यासाठी पर्यायी उपायोोजना करणे अशक्य असल्याने शहरात अवजड, मोठय़ा वाहनांवर शनिवार, रविवारी तरी बंदी घालणे, रस्ते, पदपथ, गल्ली बोळातील फेरीवाले उठवणे असे उपाय करावे लागतील. शहरातील रिक्षा मीटरचा वापर करीत नाहीत. हे जरी आरटीओच्या अखत्यारित येत असले तरी महापालिकेच्या रस्त्यांचा वापर रिक्षाचालक करीत असल्याने या रिक्षा चालकांसाठी पालिकेने नियमावली करणे आवश्यक आहे. डोंबिवली पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा एकच पूल आहे. वाढत्या वाहनांचा विचार करून कमीत कमी दोन पूल तरी या भागात आवश्यक आहेत. डोंबिवली पश्चिमेतून ठाण्याला जाण्यासाठी माणकोली खाडी पूल झाल्यावर त्याचा उपयोग शहरातील वाहतूक कोंडी कमी होईल. विशेष म्हणजे या पुलाचे काम मार्गी लावण्याचे काम पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारित आहे. त्यांनी या कामी अधिक लक्ष द्यावे. डोंबिवली ते शिळफाटा या १२ किलोमीटरच्या अंतरावर इतकी वाहतूक कोंडी असते की हे अंतर पार करायला दीड ते दोन तास लागतात. त्यामुळे लोढा-पलावा चौकात तातडीने उड्डाणपूल बांधणे आवश्यक आहे. डोंबिवलीतील रस्ते, कोपरे, गल्लीबोळ कचऱ्यांनी तुडुंब भरलेले असतात. रिक्षा चालक वाहनतळावर, रस्त्याने येजा करताना रस्त्यावर थुंकतात. काही पादचारी रस्त्यावर पिचकारी मारतात. अशांना दंड करण्यासाठी पालिकेने यंत्रणा उभी करावी. शहरात सार्वजनिक प्रसाधनगृह, स्वच्छतागृह नाहीत. त्यामुळे महिलांची सर्वाधिक कुचंबणा होते. या प्राथमिक गरजेचे कोणाला भान नाही याचे आश्चर्य वाटते. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने मोकळ्या जागा, उद्याने, बागा विकसित करणे आवश्यक आहे. न्यायालयाने दिल्ली शहरातून अनेक उद्योगांचे स्थलांतर करावयास लावले. डोंबिवली परिसरात हे कधी होईल का, असा प्रश्न पडतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 8, 2015 7:44 am

Web Title: famous personality view about kalyan dombivli city
Next Stories
1 दहीहंडींच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग
2 गणेश बोराडे पुन्हा पालिकेच्या सेवेत
3 आरोग्य निरीक्षकाला माहिती आयुक्तांकडून दंड
Just Now!
X