tvlog03कृषिप्रधान असलेल्या आपल्या देशात शेतीचे महत्त्व अनन्यसाधारण. पण सिमेंटच्या जंगलात राहणाऱ्या शहरी तरुणाईला शेतीबाबत किंवा त्यातील पिके, फळे, फुले यांबाबतचे ज्ञान अत्यल्पच. मात्र शेती, विविध पिके, झाडे यांबाबत शहरी तरुणाईला कुतूहल आणि आकर्षण असते. त्यामुळेच सहजसफर म्हणून अनेक तरुण कृषी पर्यटन केंद्रांना भेट देतात. मात्र कृषी पर्यटन केंद्रांमध्ये बहुधा मनोरंजनच अधिक असते. कृषीज्ञान तिथे अल्प प्रमाणातच मिळते. शेतीविषयक ज्ञानासाठी किंवा प्रत्यक्ष शेती कामाचा अनुभव घ्यायचा असेल, विविध पिके, फळझाडे, फुलझाडे यांचे दर्शन घ्यायचे असेल तर बदलापूरजवळील बेंडशिळ या गावाला नक्की भेट द्या.
कृषीतज्ज्ञ असलेल्या राजेंद्र भट यांनी या गावात पाच एकरात मळा फुलविला आहे. निसर्गपूरक आणि सेंद्रिय शेती करणाऱ्या भट यांच्या या शेतात असंख्य पिके आढळतात. बहुपीक पद्धतीचा पुरस्कार करत भट यांनी निसर्गपूरक शेतीचा वेगळा ठसा उमटवला आहे. ‘निसर्ग मित्र’ नाव असलेल्या या परिसरात केवळ मनोरंजनच नव्हे, तर विविध प्रकारच्या माहितीचा खजिना सापडतो. बदलापूरपासून सात ते आठ किलोमीटर अंतरावर बेंडशिळ हे गाव आहे. हिरवाईने नटलेल्या या गावात निसर्गसौंदर्याचा देखणा नजारा आपल्याला पाहिला मिळतो. गावाच्या एका बाजूलाच भटवाडी नामक परिसरात ‘निसर्ग मित्र’ फार्म आहे. या शेतात भात, आंबा, नारळ ही नियमित पिके तर आपल्याला पाहायला मिळतातच, पण काही अनोखी फुलझाडे, फळझाडे, औषधी वनस्पती यांचेही दर्शन येथील शेतात आल्यावर होते. कोक ही वनस्पती अनेकांना माहीत आहे, ज्यापासून चॉकलेट बनविले जाते. या वनस्पतीचे दर्शन भट यांच्या घराजवळच आपल्याला होते. तेथून आपण त्यांच्या मळय़ात फिरू लागतो आणि एकेक वनस्पती नजरेस पडते. मोहरी, काळी मिरी आदी मसाल्याच्या पदार्थापासून नागवेल, हरी पत्ती आदी ‘विडय़ाच्या पाना’त असतात ते पदार्थ या सर्वाचे ‘वनस्पती’रूपी दर्शन आपल्याला येथे होते. तब्बल ८७ प्रकारच्या वनस्पतींची लागवड या शेतात करण्यात आली आहे. अनेकदा शेत म्हटले की एकाच जागेत एकच पिक असे चित्र समोर येते. पण भट यांच्या या शेतात एकाच ठिकाणी बहुपिके आढळतात. भट यांनी बहुपीक, बहुस्तरीय अशा पद्धतीचाच अवलंब केला आहे.
आपण अनेक पालेभाज्या, फळभाज्या, फळे यांचे सेवन करतो, मात्र याचा मूळ उगम कोठून होते, याबाबतचे ज्ञान अत्यल्पच असते. या सर्व वनस्पतींचे दर्शन येथे होते. अगदी ड्रॅगन फ्रुट या आंग्लफलाचा वृक्षही येथे आढळतो. ताम्हणी हे महाराष्ट्राचे राजफुल. या सौंदर्याने नटलेल्या पुष्पाचे दर्शन येथे होते. फुलांचा सुगंधी दरवळ अनुभवण्यासाठी, त्याचबरोबर पक्ष्यांचा किलबिलाट ऐकण्यासाठी या ‘निसर्ग मित्र’ शेताला जरूर भेट द्यावी.
शेतीबाबत विद्यार्थ्यांचा आणि तरुणाईचा ओढा वाढावा, यासाठी राजेंद्र भट विविध प्रयोग करतात. त्यासाठी या शेतावरील सहली घडवून आणल्या जातात. पर्यावरणप्रेमी असलेल्या भट यांचे जागतिक शेतीविषयक ज्ञान अफाट आहे, त्यांच्या शेतावर फेरफटका मारताना विविध वृक्षांची, वनस्पतींची, वेलींची माहिती ते देतात. त्याबरोबरच पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी काय करणे गरजेचे आहे, शेतकऱ्यांनी कशा प्रकारे शेती करावी आदी अनेक गोष्टींचे ज्ञान या सहलीतून आपल्याला होऊ शकते. त्याचबरोबर शेतावर काम करण्याची इच्छा असेल, तर ती इच्छाही येथे पूर्ण होऊ शकते. त्यासाठी विविध प्रयोग येथे राबविले जातात. या शेतात राहण्याची आणि जेवणाचीही सोय करण्यात आलेली आहे. कोणत्याही कीटकनाशकांचा आणि रासायनिक खतांचा वापर न करता पिकविल्या जाणाऱ्या वनस्पतींद्वारे मिळणाऱ्या सकस आहाराचे सेवन करायला मिळणे, ही तशी दूर्मीळ गोष्ट, मात्र हा अलौकिक अनुभव येथे मिळतो. या शेताच्या बाजूलाच एक ओढा असून, त्यावर बांधलेल्या छोटय़ाशा बंधाऱ्यामुळे येथे पाण्याचा सदैव खळखळाट अनुभवयास मिळतो. शेतीसफर करताना येथे वर्षांसहलीचाही आनंद घेता येऊ शकतो. पंचेद्रियांना सुखावणारी ही शेतीसफर आपल्याला वेगळाच आनंद देईल हे निश्चित!
कसे जाल?
बेंडशिळ, बदलापूर
* मध्य रेल्वेवरील बदलापूर स्थानकावर उतरावे. तेथून रिक्षाने बेंडशिळ गावात जाता येते. मात्र रिक्षाचे भाडे आधीच ठरवून घ्या.
* खासगी वाहनाने जाणार असाल, तर बदलापूरहून कोंडेश्वरला जाणाऱ्या मार्गाने जाता येते. या मार्गावरील दहिवली येथून बेंडशिळला जाण्यासाठी