घरी परतणाऱ्या रुग्णांना मार्गदर्शन

कल्याण : भिवंडी जवळील रांजनोली येथील टाटा आमंत्रा प्रकल्पातील विशेष करोना रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांचे मनोधैर्य वाढावे यासाठी महापालिका प्रशासनामार्फत वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविल्या जात आहेत. बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांना घ्यावयाची काळजी, यापुढे पार पाडावयाची जबाबदारी असे मार्गदर्शन उपस्थित महापालिका अधिकाऱ्यांकडून केले जाते. राष्ट्रगीत गाऊन बाधित रुग्ण शिलेदार कर्मचाऱ्यांना प्रेमाने निरोप देऊन घरच्या प्रवासाला सुरुवात करतात.

टाटा आमंत्रा प्रकल्पात २४ तास बाधित, संशयित, विलगीकरणातील रहिवाशांची रुग्णवाहिका, बसमधून ये-जा सुरू असते. बाधित रुग्णाला घेऊन प्रकल्पात रुग्णवाहिका आली की काही वेळ धावपळ असते. प्रत्येक जण सावध पवित्रा घेतो. बाधित रुग्णाला सर्व सेवासुविधा देऊन त्याला निश्चित केलेल्या उपचार कक्षात दाखल केले जाते.

अचानक उद्भलेले हे संकट आहे. त्या परिस्थितीत प्रशासनाकडून उपचार केले जात आहेत, अशी माहिती कर्मचाऱ्यांकडून रुग्ण, नातेवाईकांना दिली जाते. ज्येष्ठ, वृद्ध, महिला, पुरुष, लहान मुले, तरुण, तरुणी या प्रकल्पात उपचार घेतात.

रुग्ण एकदा बरे झाले. त्यांना घरी सोडण्याच्या दिवशी तळ मजल्याला आणून मागील अडीच महिन्यांपासून टाटा आमंत्रा प्रकल्पात नेमणुकीवर असलेले पालिका उपअभियंता प्रमोद मोरे मार्गदर्शन करतात. उपचार घेत असताना काही गैरसोय झाली असेल तर त्याबद्दल नाराजी ठेवू नये अशी विनंती केली जाते. आठ ते १० दिवसांत आपण ठीक व्हावे ही प्रार्थना करून आम्ही आपली सेवा केली. इतर साथींपेक्षा हा आजार वेगळा असल्याने अशा प्रकारच्या साथीशी लढताना तारांबळ जरूर उडत आहे. पण त्या परिस्थितीत जुळवून घेऊन आम्ही आपली सेवा करत आहोत. रुग्ण, नातेवाईकांच्या तक्रारी आल्या. त्या सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे. घरी गेल्यानंतर प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घ्यायची आहे. सामाजिक अंतर ठेवून सोवळे पाळायचे आहे, असे उपअभियंता प्रमोद मोरे ठीक रुग्णांना सांगतात. हे मार्गदर्शन पार पडल्यानंतर राष्ट्रगीत होऊन निश्चित केलेल्या परिवहनच्या बसमधून रुग्णांना घरी सोडले जाते.