सर्व महापालिकांना राज्य सरकारची सूचना

बाजार समित्यांमधील दलाल, आडते, घाऊक व्यापारी यांच्या नियंत्रणातून मुक्त करण्यात आलेल्या शेतमालाची शेतकऱ्यांना थेट ग्राहकांना विक्री करता यावी, यासाठी राज्य सरकारने महापालिकेच्या मंडया शेतकऱ्यांना खुल्या करून देण्याचा निर्णय घेतला आहे. पालिकेच्या कार्यालयांमध्ये आठवडी बाजार भरवणे, पालिका हद्दीतील चार मैदाने शेतकऱ्यांना भाजीविक्रीसाठी उपलब्ध करून देणे यासोबतच पालिकेच्या मंडयांमध्येही शेतकऱ्यांना जागा द्याव्यात, अशा सूचना राज्य सरकारने मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील महापालिकांना केल्या आहेत.

कृषी मालाच्या खरेदी-विक्रीवरील बाजार समित्यांचे नियंत्रण हटविण्याचा मोठा निर्णय राज्य सरकारने घेतला असला तरी प्रत्यक्ष बाजारपेठेवर त्याचा फार परिणाम होत नसल्याचे चित्र आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई तसेच आसपासच्या शहरांना प्रामुख्याने पुणे, नाशिक जिल्ह्य़ांमधील शेतांमधून भाजीपाल्याची आवक होत असते. राज्यातील आवक कमी होते तेव्हा गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यातून मोठय़ा प्रमाणावर भाजीपाला मुंबईत येत असतो. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणारा घाऊक बाजार यासाठी महत्त्वाचा ठरतो. या बाजारांमध्ये दररोज शेकडो गाडय़ांमधून भाजीपाला येतो आणि पुढे किरकोळ विक्रेत्यांमार्फत तो मुंबई, ठाणे, नवी मुंबईच्या दिशेने विक्रीसाठी नेला जातो. बाजार समित्यांचे नियंत्रण काढून घेताना शेतकऱ्यांनी थेट ग्राहकांपर्यंत माल न्यावा असा सरकारचा उद्देश आहे. मात्र, थेट माल ग्राहकांपर्यंत न्यायचा म्हणजे नेमका कुठे आणि कसा विकायचा हा प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मुंबईसारख्या मोठय़ा शहरातही यासाठी पुरेशा पायाभूत सुविधा नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत नेण्याची संकल्पना प्रत्यक्षात उतरत नसल्याचे चित्र आहे. हे लक्षात घेऊन सरकारने शेतकऱ्यांना थेट शहरांची कवाडे खुली करण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या लढविण्यास सुरुवात केली आहे.

सरकारची ही योजना यशस्वी करण्यासाठी ठाणे शहरात भाजपचे आमदार संजय केळकर यांनी महापालिकेच्या सहकार्याने यापूर्वीच आठवडी बाजार भरविण्यास सुरुवात केली आहे. या प्रयोगास ठाणेकरांचा उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचे पाहून मुंबई, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली तसेच महानगर क्षेत्रातील इतर महापालिकांनीही आठवडी बाजारांसाठी किमान चार मैदाने खुली करून देण्याचे आदेश दिले आहेत. हे करत असताना महापालिका तसेच नगरपालिकांनी उभारलेल्या मंडयांमध्येही शेतकऱ्यांना थेट प्रवेश दिला जावा, असा आदेश राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांमधील मोकळ्या आवारात स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करण्याच्या सूचना यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. असे असताना मंडयांमध्येही शेतकऱ्यांना जागा करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याने महापालिकांना यासंबंधीचे नव्याने नियोजन करावे लागणार आहे. ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरात नव्या मंडयांची उभारणी सुरू आहे. मुंबईत महापालिकेच्या मालकीच्या अनेक मंडया आहेत.

खेळाडू नाराज

महापालिकांनी शहरातील चार मैदाने शनिवार आणि रविवारी उपलब्ध करून द्यावीत, असा आदेश देताना शेतकऱ्यांसाठी तात्पुरते आच्छादन उभारले जावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. शनिवार आणि रविवारी मुंबई, ठाण्यातील मैदानांमध्ये खेळाडूंची मोठी गर्दी होत असते. असे असताना तात्पुरते का होईना आच्छादन उभारून खेळाची जागा ताब्यात घेतली जाणार असल्याने खेळाडूंमधून नाराजीचा सूर उमटत आहे.