नियंत्रण मुक्तीच्या प्रयोगाला भरघोस प्रतिसाद
शेतातला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याची राज्य सरकारची घोषणा प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न सध्या डोंबिवलीत सुरू झाला असून जुन्नर, आंबेगाव तालुक्यातील ताजी भाजी डोंबिवलीतील रस्त्यांवर मिळू लागल्याने येथील ग्राहक सध्या सुखावले आहेत. शॉप फॉर चेंज या tv18संस्थेच्या पुढाकारातून डोंबिवलीतील वेगवेगळ्या ठिकाणी उभारण्यात आलेली ही किरकोळ भाजी केंद्रे सध्या येथे चर्चेचा विषय ठरू लागली आहेत. पदपथांवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या तुलनेत या केंद्रांवर काहीशा चढय़ा दरांनी भाजी विक्री होत असली तरी शेतातला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहचविण्याच्या या अभिनव प्रयोगाला डोंबिवलीकरांचा भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे.
समाजमाध्यमांतून ग्राहकांना माल किती वाजता येणार आहे याची माहिती दिली जात असल्याने एक तास अगोदरच नागरिक त्या परिसरात रांगा लावून गर्दी करताना दिसत आहेत. मध्यंतरी व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या काळातही ग्राहकांना या सेवेमुळे भाजीपाला उपलब्ध झाला होता. डोंबिवलीतील समीर आठवले, शिल्पा कशेळकर, मंदार कुलकर्णी, श्रणीक गर्गे या चार तरुणांनी एकत्र येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. मुंबई, ठाणे तसेच आसपासच्या शहरांना पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ातून प्रामुख्याने भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. कल्याण-डोंबिवली ही शहरे माळशेज घाटामुळे जुन्नर, आंबेगाव, नारायणगाव यासारख्या भाजीपाल्याने संपन्न असलेल्या प्रदेशाच्या जवळ आली आहेत. त्यामुळे या तालुक्यांतील शेतमाल थेट डोंबिवलीकरांना मिळणार आहे.

डोंबिवलीत पाच ठिकाणी केंद्रे
नारायणगाव, मंचर, जुन्नर, नाशिक आदी ठिकाणाहून हा माल डोंबिवलीत सायंकाळी साडे पाचच्या दरम्यान येतो. त्यानंतर साडेआठ वाजेपर्यंत या मालाची विक्री सुरू असते. दररोज दीड ते दोन टन भाजीपाल्याची विक्री होत आहे, असे मंदार कुलकर्णी यांनी सांगितले. ग्राहकांचा प्रतिसाद पाहता शहरात पाच ठिकाणी हे विक्री केंद्र सुरू करण्याचा विचार ते करीत आहेत. पश्चिमेला दोन ठिकाणी तर पूर्वेला तीन ठिकाणी ही विक्री केंद्रे सुरू केली जाणार आहेत. टिळकनगर, सव्‍‌र्हेश हॉल परिसर आणि स्टेशन परिसरात प्राथमिक प्रयोग आम्ही राबविणार आहोत. स्टेशन परिसरात विक्री केंद्र सुरू केले तर लोढा, रिजन्सी यांसह इतर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनाही याचा फायदा होईल.