07 August 2020

News Flash

शेतकरी आठवडा बाजार यापुढे पदपथांवर

पदपथांवर भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे ठाण्यात नुकताच मोठा राजकीय वाद झाला.

जयेश सामंत, ठाणे

शेतकऱ्यांच्या आठवडा बाजारासाठी यापुढे शहरातील प्रमुख रस्त्यांलगत असलेल्या पदपथांवरील मोकळ्या जागा उपलब्ध करून देण्याचे आदेश सरकारने राज्यातील मुंबई, ठाण्यासह सर्वच महापालिकांना दिले आहेत.

पदपथांवर भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे ठाण्यात नुकताच मोठा राजकीय वाद झाला. त्यानंतर सरकारकडून हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नेहमीच्या फेरीवाल्यांसह या आठवडा बाजारांमुळे पदपथ व्यापले जाण्याची भीती आहे.

यापूर्वी शहरातील मोकळी मैदाने तसेच गृहनिर्माण संस्था किंवा रहिवासी कल्याण संघांच्या आवारात हे बाजार भरविले जावेत, असे सरकारचे आदेश होते. मात्र नव्या आदेशामुळे पदपथांवरील नागरिकांचा चालण्याचा अधिकारच हिरावून घेतला जाण्याची चिन्हे आहेत.

मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरांमधील पदपथ तसेच रस्त्यांच्या कडेला बसणारे बेकायदा फेरीवाले आणि आता बेकायदा बाजार ही तेथील रहिवाशांची डोकेदुखी ठरली आहे. ठाण्यात पदपथावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने भरविण्यात आलेल्या आंबा बाजारामुळे या भागात राजकीय वादंग झाले आणि त्यातून थेट हाणामारीही झाली. ठाण्यातील हा प्रश्न धुमसत असताना राज्य सरकारने नवा आदेश ठाण्यासह सर्व पालिकांसाठी काढला. या नव्या आदेशामुळे शहरातील मुख्य रस्त्यांवरील पदपथ यापुढे शेतकरी आठवडा बाजारांसाठी खुले करून देण्याची सक्ती करण्यात आली आहे.

नागरिकांमध्ये आश्चर्य..

शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनास योग्य दर मिळावे, तसेच ग्राहकांनाही दर्जेदार भाजीपाला, फळे यासारखा कृषी माल उपलब्ध व्हावा यासाठी सरकारने चार वर्षांपासून ही योजना सुरू केली आहे. या बाजारांना बळ मिळावे यासाठी शहरातील मैदानांमध्ये तसेच गृह संकुलांच्या आवारात असे बाजार सुरू करण्याची परवानगी दिली जावी, असे आदेश नगरविकास विभागाने यापूर्वी काढले होते. असे असले तरी नवी मुंबई, ठाणे, मुंबई अशा शहरांमध्ये रहदारी नसलेल्या रस्त्यांलगतच्या पदपथांवर यापूर्वीही हे बाजार सुरू केले आहेत. यापुढे मात्र महत्त्वाच्या रस्त्यांलगतचे पदपथ या बाजारांसाठी खुले करून दिले जावेत, असे आदेश नगरविकास विभागाने काढल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

आदेशात काय?

’ राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने काढलेल्या नव्या आदेशानुसार संत शिरोमणी सावता माळी शेतकरी आठवडा बाजार योजनेसाठी यापुढे शहरातील सर्वच महापालिका प्रभागांमधील प्रमुख रस्त्यांलगतचे पदपथ उपलब्ध करून देण्याचे फर्मान.

’ याशिवाय ज्याठिकाणी रस्ता संपतो अशा जागा, शिवाय महापालिका हद्दीतील भाजी मंडया तसेच नव्याने निर्माण होणाऱ्या मंडया, व्यापारी संकुले यामधील गाळे तसेच मोकळ्या जागाही आठवडा बाजारांसाठी खुल्या करून देण्याची सूचना.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 30, 2019 1:41 am

Web Title: farmer week market now onward on footpaths
Next Stories
1 ‘टोरंट’बाबत सरकार सुरुवातीपासून उदार
2 मोबाइल ‘नेटवर्क हॅक’ करून पैसे लुटणारी टोळी उघड
3 दहावी, बारावीनंतरच्या पर्यायांवर प्रकाश
Just Now!
X