आढावा बैठकीत शेतकऱ्यांना सल्ला
खरीप हंगामात भात शेतीबरोबरच भाजीपाला, फुलशेती, तूर व इतर कडधान्ये लागवडीवर मोठय़ा प्रमाणावर भर देण्याचा प्रयत्न जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी आवश्यक यंत्रणा, माहिती आणि अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्ह्य़ाच्या खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत लोकप्रतिनिधींनी कृषी अधिकाऱ्यांना दिल्या. राज्याची खरीप हंगाम बैठक २८ एप्रिल रोजी होणार असून त्या पाश्र्वभूमीवर ठाणे जिल्ह्य़ातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींची बैठक गुरुवारी पार पडली. ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या उपस्थितीमध्ये ही सभा पार पडली.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात पार पडलेल्या या बैठकीत कृषी विभागाच्या वतीने गेल्या वर्षीच्या कृषी उत्पादनाचा आढावा घेतला. तर पुढील दिवसांचा कृती आराखडा उपस्थितांसमोर मांडण्यात आला. जलयुक्त शिवार योजनेसाठी यंदा १८ गावांमध्ये २१ कोटी रुपये खर्चून विविध कामेही करण्यात येणार आहेत. कमीत कमी पाण्यावर जास्तीत जास्त कृषी उत्पादन घेण्यावर भर देण्यात येणार आहे. जिल्ह्य़ात २०१६-१७ मध्ये भात पिकाचे उत्पादन प्रति हेक्टर २५.५० किलोपर्यंत वाढविण्यासाठी काही स्थानिक वाणांची लागवड करण्यात येईल. यासोबतच कडधान्य पिके व भाजीपाला घेण्यावरही भर असेल. शेतकऱ्यांच्या शेतीतून थेट ग्राहकापर्यंत विक्री या योजनेला अधिक प्रोत्साहन देण्यात येणार आहे. आंतरपीक म्हणून तूर लागवडीसाठी ३० हजाराच्या कृषी साहित्याचे वाटप करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आले. बचत गटांना शेती व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहन, २०० पॉवर टिलर आणि २० ट्रॅक्टर्सचा पुरवठा, २५ हरितगृहांची उभारणी, ७५ शेतकऱ्यांना फलोत्पादनासाठी प्रशिक्षण, राष्ट्रीय फलोत्पादनातून २० शेततळी, ३५० मत्स्यबीज डब्यांचे वाटप, १४ शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करणे, सेंद्रिय शेती वाढविण्यासाठी ५० शेतकऱ्यांचा गट तयार करणे, मोहापासून तेल तसेच मोगरा शेतीसाठी लागवड अशी काही उद्दिष्टे कृषी विभागाने ठेवल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक महावीर जंगटे यांनी यावेळी सांगितले.
कृषी विभाग तसेच जिल्हा परिषद यांचा शेतकऱ्यांशी सातत्याने संपर्क हवा. वर्षांतून एकदाच शेतकरी मेळावा घेऊन कोणताही फायदा होत नाही. किती पाऊस होणार आहे याचा अंदाज घेऊन नेमकी कोणती पिके घेतली पाहिजे ते शेतकऱ्यांना कळावे, असे विचार खासदार कपिल पाटील यांनी व्यक्त केले.

वनराई बंधाऱ्यांची संख्या वाढावी..
केवळ भात शेतीवर अवलंबून न राहता जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांनी भाजीपाला, फुलशेती, तूर व इतर कडधान्ये लागवड मोठय़ा प्रमाणावर करावी यासाठी त्यांना व्यवहार्य आणि नियोजनबद्ध रीतीने मार्गदर्शन व्हावे, अशी सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. वनराई बंधाऱ्यांची संख्याही गेल्या वेळेपेक्षा जास्त असावी व त्यात लोकसहभागही मिळवावा. जास्तीत जास्त क्षेत्र सिंचनाखाली येण्यासाठी कृषी तसेच जलसंपदा व जलसंधारण विभागांनी पावले उचलावीत. शेतीमधील तंत्रज्ञान बदलत आहे, नवे संशोधन येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन झाले पाहिजे आणि योजनांची माहिती व्यवस्थित मिळायला हवी.