खरेदीवरील ५० टक्केरक्कम शेतकऱ्यांना दान; डोंबिवलीतील दोन तरुणांचा उपक्रम

दुष्काळामुळे बळीराजा आत्महत्या करीत असताना त्यांच्या मदतीसाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही शेतक ऱ्यांना मदत करायची झाल्यास त्यांना घरबसल्या ती करता यावी अशी आखणी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील दोघा डोंबिवलीकर तरुणांनी केली आहे. ऑनलाइन शॉपिंगच्या माध्यमातून सर्वसामान्य नागरिकांना शेतकऱ्यांना या योजनेद्वारे मदत करता येणार आहे.

डोंबिवलीतील हर्षद गायकवाड व कल्याणमधील कासम शेख हे दोघे तरुण माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी दुष्काळाने पिचला असून कर्जबाजारीपणामुळे तो आत्महत्या करू लागला आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या मदतीसाठी आपणही काहीतरी करायला हवे असे या दोघांना वाटत होते. ‘नाम’ संस्थांसोबतच अनेक खासगी संस्था शेतक ऱ्यांना मदतीसाठी पुढे सरसावल्या आहेत. असे असताना सर्वसामान्य नागरिकांना या संस्थांपर्यंत पोहचता येत नाही. यावर उपाय म्हणून नागरिकांना घरबसल्या कशी मदत करता येईल याचा विचार या तरुणांनी सुरू केला. ऑनलाइन शॉपिंगचे वेड प्रत्येकालाच असते. या शॉपिंगमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र दिसून येते. याचा आधार घेत या तरुणांनी ‘शॉप फॉर फार्मर’ म्हणजेच शेतकऱ्यांसाठी खरेदी असा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून फुकट बाजार डॉट कॉम ही वेबसाइट तयार करण्यात आली आहे. या वेबसाइटवर अ‍ॅमेझॉन, स्नॅपडील, शॉपक्लुज, फ्लिपकार्ट या ऑनलाइन शॉपिंगच्या लिंक जोडण्यात आल्या आहेत. या वेबसाइट ऑनलाइन खरेदी-विक्रीसाठी आघाडीच्या मानल्या जातात. त्या वेबसाइटवर घेण्यात आल्या आहेत. यावर खरेदी करणाऱ्या ग्राहकांना खरेदीवर बक्षीस मिळणार असून त्या खरेदीतील ५० टक्के रक्कम ही शेतकऱ्यांना दान केली जाणार आहे. यासाठी आम्ही नाम फाऊंडेशनसोबत चर्चा करत असून ही रक्कम त्यांच्याद्वारे शेतकऱ्यांना दिली जाणार आहे, असेही कामस शेख यांनी सांगितले.