तळपत्या उन्हात नाशिकहून पाच दिवसांची पायपीट; सोमवारी विधानभवनाला घेराव

गारपिटीमुळे उभ्या पिकाचा घास हिरावला गेलेले शेतकरी.. बोंडअळीमुळे नुकसानग्रस्त झालेले कापूस उत्पादक..  समृद्धी महामार्गात जमिनींवर पाणी सोडावे लागणारे भूमालक.. नद्याजोड प्रकल्पात विस्थापित झालेले तसेच वनजमिनीपासून वंचित झालेले शेतकरी अशा समदु:खाने पोळलेल्या पालघर, ठाणे, अहमदनगर, परभणी, औरंगाबाद, नंदुरबार, सांगली, पुणे, कोल्हापूर, नांदेड या जिल्ह्य़ांतील सुमारे तीस हजार शेतीधारकांचा जथा गेल्या पाच दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी तळपत्या उन्हात यात्रासंघर्ष करीत आहे.

शुक्रवारी सकाळी शहापूर रस्त्यावर लाल बावटय़ातील हजारो शेतकऱ्यांचा ताफा दाखल झाला आणि ‘लाँग मार्च चिरायु होवो’ अशा घोषणांनी नाशिक-मुंबई महामार्ग दणाणून निघाला. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी अखिल भारतीय किसान सभेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मोर्चात संपूर्ण राज्यभरातील शेतकरी सामील झाले असून गेले पाच दिवस नाशिक ते मुंबई त्यांची अथक पायपीट सुरू आहे. १२ मार्चला विधानभवनाला घेराव घालून शेतकरी आपल्या मागण्यांसाठी सरकारला साकडे घालणार आहे.

तळपत्या उन्हाच्या चटक्यामुळे शरीर पोळून निघत असले तरी जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या हक्काच्या मागण्या शासनाकडून पूर्ण करण्यासाठी या शेतकऱ्यांमध्ये हिंमत एकवटली आहे. शुक्रवारी शहापूर रस्त्यावर दाखल झाल्यावर या मोर्चेकऱ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणा सुरू केल्या. राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दाखल झालेले शेतकरी गटागटाने या मोर्चाचे नियोजन करीत आहेत. शेतकऱ्यांच्या गटप्रमुखांकडून रात्री पुढच्या प्रवासाच्या सूचना दिल्या जात आहेत. पहाटे पाच वाजता मुक्काम स्थळावरून मुंबईच्या दिशेने पायपीट करण्यास सुरुवात केल्यावर तब्बल तीस ते पस्तीस किमी अंतर पार केल्यावर हजारो शेतकऱ्यांचा ताफा भोजनासाठी निश्चितस्थळी थांबतो. प्रत्येकाच्या आर्थिक वकुबानुसार शेतकऱ्यांनी या मोर्चात सहभागी होण्यापूर्वीच शिधा, सरपण जमा केले आहे. गेले पाच दिवस खिचडी, डाळ-भात असे साधे जेवण करून हा जथा मुंबईच्या दिशेने निघाला आहेत. जेवणानंतर तळपत्या उन्हात पुन्हा महामार्गावरून मुंबईची वाट धरायची, हा दिनक्रम मागण्या पूर्ण होईस्तोवर तुटणार नाही, असे नाशिक जिल्ह्य़ातील शेतकरी इंद्रजीत गावित यांनी सांगितले. सायंकाळी पाच वाजता मुक्कामाच्या ठिकाणी थांबल्यावर सात वाजता प्रत्येक विभागाचे शेतकरी त्यांच्या विभागाचे नाव घेऊन शेतकऱ्यांना जेवणासाठी आमंत्रित करतात.

जेवण झाल्यावर शेतकऱ्यांना विरंगुळा मिळावा म्हणून काही मनोरंजनाचे कार्यक्रम सादर केले जातात, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांसाठी हा मार्ग कितीही खडतर असला तरी मागण्या पूर्ण करण्यासाठी त्यांची इच्छाशक्ती प्रचंड मोठी आहे. मुंबईत दाखल होईपर्यंत शेतकऱ्यांची संख्या निश्चितच वाढणार आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत कितीही दिवस लागले तरी विधानभवनाला शेतकरी घेराव घालून बसणार आहेत, असे अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष डॉ. अशोक ढवळे यांनी सांगितले.

आरोग्य ठणठणीत..

नाशिक-मुंबईच्या पायी प्रवासाच्या दरम्यान शेतकऱ्यांना आरोग्याची समस्या उद्भवल्यास प्रत्येक तालुक्यात रुग्णवाहिकेची सोय करण्यात आली आहे.

शहापूर तालुक्यात पहाटेपासून दाखल झालेले शेतकरी उन्हात पायी चालत असले तरी कुणालाही आरोग्याची समस्या जाणवली नाही. फक्त मोर्चेकरींजवळ रुग्णवाहिका गेल्यास शेतकऱ्यांचे समूह या वाहनाजवळ येतात आणि ‘केवळ पाय दुखले, आता औषध द्या’, अशी विनवणी डॉक्टरांजवळ करतात, असे खर्डी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. ज्ञानेश्वर राऊत सांगत होते.

वाहतूककोंडी

हजारो शेतकऱ्यांचा ताफा शुक्रवारी मुंबई-नाशिक महामार्गावर जेवणाच्या विश्रांतीसाठी थांबला होता. त्यामुळे दुपारी बाराच्या सुमारास या वाशिंदजवळ मोठय़ा प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. तब्बल तीस हजार शेतकरी या महामार्गालगत असलेल्या मैदानात जेवणासाठी दाखल होईपर्यंत अर्धा ते पाऊण तास या रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

आदिवासी वाद्यांचे बळ..

दिवसभराची पायपीट करून मुक्कामाच्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या विरंगुळ्यासाठी काही हौशी शेतकऱ्यांकडून वाद्ये वाजवली जातात. पायपीट करून कितीही थकवा आला असला तरी वाद्ये वाजू लागल्यावर नृत्य सादर करण्यासाठी शेतकऱ्यांचे घोळके जमतात. एकीकडे हक्काच्या मागण्यांसाठी नाशिक ते मुंबई असा १८० किमीचा प्रवास पायी करण्याचे ध्येय असले तरी हे नृत्य सादर करताना शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर केवळ निखळ आनंद होता. आम्हा शेतकऱ्यांची इच्छाशक्ती फार मोठी आहे. थकवा आला तरी रात्री दोन वाजेपर्यंत या वाद्यांच्या तालावर नाचताना थकवा जाणवत नाही, असे या मोच्र्यात नृत्य सादर करणारे प्रभाकर मुरुज यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या मागण्या?

* संपूर्ण कर्जमाफी हवी.

वनजमिनी भूमिहीन आदिवासींच्या मालकीची व्हावी.

* वृद्धापकाळात शेतकऱ्यांना निवृत्ती पेन्शन योजना लागू करावी.

* गुजरात राज्याच्या फायद्याचा नद्याजोड प्रकल्प रद्द करावा.

* सर्व शेतकऱ्यांना नवीन रेशनकार्ड द्यावीत.

* प्रत्येक कुटुंबाला प्रधानमंत्री आवास योजनेतून हक्काचे घर मिळावे.

* शेतकऱ्यांना चोवीस तास वीज, पाणी उपलब्ध व्हावे.