जमिनी देण्यास शेतकऱ्यांची परवानगी; कल्याण-डोंबिवलीतील अंतर्गत वाहतूककोंडी सुटणार
कल्याण-डोंबिवली शहरांतील अंतर्गत वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी खाडी किनाऱ्याला लागून शहराच्या बाहेरील बाजूने जाणाऱ्या बाह्य वळण रस्त्याचा (रिंगरूट) मार्ग आता मोकळा झाला आहे. गेल्या वीस वर्षांपासून विविध कारणांमुळे अडकलेला हा रस्ता या मार्गावरील शेतकऱ्यांच्या विरोधामुळे रखडला होता. मात्र शेतकऱ्यांकडून जमीन संपादित करताना त्यांना योग्य मोबदला देण्याचे तसेच कोणावरही अन्याय होऊ न देण्याचे आश्वासन पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी आपला विरोध मागे घेतला. त्यामुळे आता लवकरच या रस्त्याचे काम सुरू होण्याची चिन्हे आहेत.
डोंबिवली-कल्याण-टिटवाळा असा असलेला हा बाह्य वळण रस्ता ज्या जमिनीवरून जाणार आहे त्या जमिनी खासगी मालकीच्या आहेत. त्या जमिनी संपादित करताना पालिकेने योग्य मोबदला द्यावा, हस्तांतरणीय विकास हक्क (टीडीआर) द्यावेत, अशा मागण्या जमीन मालकांनी केल्या होत्या. त्या मान्य करत पालिकेच्या नगररचना विभागाने गेल्या वर्षी यासंबंधीचा आदेश काढला. त्याआधारे शेतकऱ्यांनी जमिनीचा सातबारा पालिकेच्या नावाने करूनही दिला. मात्र ‘टीडीआर’ हवा असेल तर जमिनीची भरणी करून द्या, कच्चा रस्ता करून द्या, बाजूला संरक्षक भिंत बांधून द्या, अशा विचित्र अटी पालिका प्रशासनाकडून शेतकऱ्यांना घालण्यात आल्या. यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी विरोधाची भूमिका घेतली. गुरुवारी सकाळी डोंबिवली पश्चिमेतील देवीचापाडा, मोठागाव भागात जमीन मोजणी अधिकारी बाह्य़ वळण रस्त्यासाठी जमीन मोजणीला आले होते. पालिकेच्या अटी जाचक असल्याने सुमारे ४० शेतकऱ्यांच्या गटाने आम्ही रस्त्यासाठी जमिनी देणार नाही, अशी भूमिका मांडली. त्यामुळे मोजणी करायला गेलेल्या अधिकाऱ्यांना माघारी परतावे लागले.
हे प्रकरण समजल्यानंतर आयुक्त ई. रवींद्रन यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलावून त्यांच्या शंका जाणून घेतल्या. तसेच त्यांचे निरसनही केले. ज्या जमिनीवर जमीन मालकासह कूळ म्हणून एखाद्या शेतकऱ्याचा कब्जा असेल व दोन्ही शेतकऱ्यांनी सामंजस्याने तिढा मिटवला तर दोन्ही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला देण्यात येईल. ‘सीआरझेड’ क्षेत्रात येणाऱ्या जमिनींना शासकीय नियमानुसार किंवा ‘मॉनिटर’ लाभ देण्यात येईल. सावकाराचा ताबा असलेल्या जमिनी शेतकऱ्यांनी परस्पर सामंजस्यातून सोडवून घ्याव्यात. त्या जमिनींच्या मोबदल्यात त्यांना ‘टीडीआर’ देण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच पालिका प्रशासनाने घातलेल्या अटीही दूर केल्या. त्यानंतर देवीचापाडा, कोपर, गरिबाचावाडा, नवापाडा, कुंभारखाणपाडा भागातील शेतकऱ्यांनी पालिकेला जमिनी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आता बाह्य वळण रस्त्याच्या कामाला गती मिळण्याची शक्यता आहे.
असा असेल मार्ग
* डोंबिवली पश्चिमेतील आयरे कोपर पश्चिम, मोठागाव, देवीचापाडा, गरिबाचावाडा, कुंभारखाणपाडा, ठाकुर्ली, चोळे, कचोरे, कल्याण पश्चिमेतील वाडेघर, उंबर्डे, कोळवली, गंधारे, बारावे, वडवली, अटाळी, आंबिवली, बल्याणी, खाडीकिनारा ते टिटवाळा असा सुमारे २६ किलोमीटर लांबीचा बाह्य़ वळण (रिंगरुट) रस्ता बांधण्यात येणार आहे.
* हा रस्ता ३० ते काही ठिकाणी ४५ मीटर रुंदीचा आहे. दहा वर्षांपूर्वी सुमारे ८० ते ९० कोटी रुपयांचा हा प्रकल्प ३८० कोटींपर्यंत पोहोचला आहे. एमएमआरडीएच्या सहकार्याने शासकीय योजनेतून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.