काळ बदलत गेला तशा सभोवतालच्या गोष्टी जशा बदलल्या तशा सण-समारंभांच्या पद्धतीतही काळानुरूप बदल होत गेले. सण-समारंभातील चालत आलेल्या रूढी-परंपरेत बदल तर झालेच शिवाय या काळात परिधान केल्या जाणाऱ्या विशिष्ट पोशाखांमधील बदलही वैशिष्टय़पूर्ण ठरले आहेत. भारतीय संस्कृतीत तसेच पारंपरिक सण, समारंभात स्वच्छतेला मोठे महत्त्व आहे. या स्वच्छतेला सोवळ्याचा साज चढविण्याची परंपरा फार जुनी असली तरी काल-परवापर्यंत ठरावीक दिसणाऱ्या रंगसंगतीत आता पाश्चिमात्य साज चढू लागला आहे. धार्मिक विधींपासून ते लग्नापर्यंत प्रत्येक ठिकाणी आपली स्वतंत्र छाप उमटवणारे अर्थात पुरुषांनी आणि तरुणांनी परिधान केलेले ‘सोवळे’ या बदलाची उत्तम साक्ष देताना दिसते.
सोवळ्याला धार्मिकदृष्टय़ा फार महत्त्व आहे. सोवळे ही खरी तर व्यापक संकल्पना आहे. सोवळे याचा अर्थ ‘स्वच्छता’ किंवा ‘नियमांचे पालन’ असा होतो. मंगलकार्यात पुरुषाने परिधान केलेल्या रंगीत वस्त्रालाही ‘सोवळे’च म्हटले जाते. नऊवारी साडी ही स्त्रियांसाठी एका प्रकारचे सोवळेच आहे. कारण पूर्वीच्या काळात किंबहुना अजूनही काही ठिकाणी नऊवारी परिधान करूनच स्त्रियांचा स्वयंपाक चालतो. नऊवारी परिधान करून स्वयंपाकघरात शिरलेल्या स्त्रीला कोणीही शिवायचे नाही या रूढीला स्वच्छतेच्या संदर्भाशी अनेकदा जोडले जाते. त्याचप्रमाणे सोवळे नेसलेल्या पुरुषाच्या देवपूजेमध्ये अन्य कोणत्या व्यक्तीने व्याधी आणू नये, असाही एक धार्मिक संदर्भ आहे. पूर्वीच्या काळात चालणारे कडक सोवळे आजमितीस फारसे कुठे पाहायला मिळत नाही.
सोवळे नेसलेल्या व्यक्तीने अंगावर उपवस्त्र म्हणून उपरणे किंवा शाल परिधान करण्याची आपल्याकडे परंपरा आहे. सोवळे नेसल्यानंतर पायात चप्पल न घालता अनवाणी कित्येक लोक वावरतात. पूर्वीच्या काळात लाल आणि पिवळा अशा दोनच रंगात सोवळे उपलब्ध होत असे. लाल सोवळ्याला ‘कद’ असे म्हणतात तर पिवळ्या रंगाच्या सोवळ्याला ‘पितांबर’ असे म्हणतात. परंतु काळानुसार हे स्वरूप बदलत गेले आणि सोवळे लाल, नारिंगी, क्रीम, मरून, जांभळा, राणी, मजेंडा, जर्मन ब्ल्यू, स्कीन कलर, भगवा अशा विविध रंगांमध्ये मिळू लागले आहे.
पारंपरिक सोवळे नेसण्याचीही एक विशिष्ट पद्धत होती. स्त्रिया साडी नेसताना जशा निऱ्या करतात, तशाच प्रकारच्या निऱ्या पारंपरिक सोवळे नेसताना कराव्या लागतात. निऱ्या व्यवस्थित झाल्या नाहीत, तर सोवळे व्यवस्थित नेसले गेले नाही, असे समजले जाते. त्याचप्रमाणे दोन्ही पायांच्या मधून निऱ्या घातलेला भाग पाठीमागील बाजूस खोचला जातो. त्याला ‘कासोटा’ असे म्हटले जाते. या सर्व गोष्टी प्रत्येकाला जमतीलच असे नाही. पारंपरिक सोवळे नेसण्याचे तंत्र जमले नाही तर चांगलीच पंचाईत होते. त्यामुळे गेल्या काही काळापासून विशेषत: गणेशोत्सवादरम्यान सोप्या पद्धतीने नेसता यावे असे सोवळे बाजारात उपलब्ध होऊ लागले आहे. सोवळे सहज नेसता यावे आणि ते फॅशनेबलही असावे या हेतूने इंडो-वेस्टर्न अर्थात भारतीय आणि पाश्चिमात्य संस्कृतीची सांगड घालणाऱ्या अनोख्या सोवळ्यांचा जन्म झाला आहे. अशाप्रकारची इंडो-वेस्टर्न सोवळ्यांची चलती ठाण्यातील बाजारात पाहायला मिळते आहे.
जीन्स किंवा ट्राऊझर पॅन्टसारखी ही सोवळी असतात. पायातून वरती सरकवलं की झालं सोवळं नेसून. त्यामुळे अगदी कमी अवधीत आणि कुठलाही त्रास सहन न करता ही सोवळी परिधान करता येतात. सध्या सुरू असलेल्या गणेशोत्सवात या ‘इंडो-वेस्टर्न’ प्रकारच्या सोवळ्यांकडे बहुतांशी ग्राहकांचा कल दिसतो आहे. त्यामुळेच कॉटन सोवळे, बेळगाव सोवळे, हाफ सिल्क, प्युअर सिल्क अशा विविध प्रकारची सोवळी बाजारात आपली छाप उमटवताना दिसत आहेत.
कॉटन सिल्क, बेळगाव सिल्क आणि हाफ सिल्कमध्ये हाफ सिल्क आणि बेळगाव सिल्क सोवळ्यांना ग्राहकांची जास्त मागणी असल्याचे, ठाण्यातील नौपाडा परिसरातील समर्थ भांडारचे भरत पटेल यांनी सांगितले. सोवळ्यावरती शॉर्ट कुर्ता घालण्याचीही फॅशन असल्याचे ते आवर्जून सांगतात.

कॉटन सोवळे
लाल, नारिंगी, क्रीम अशा तीन रंगांमध्ये ही कॉटन सोवळी पाहायला मिळतात. कॉटन सोवळ्यांबरोबर उपवस्त्र म्हणून उपरणेही बाजारात उपलब्ध आहे. कॉटन सोवळे आणि उपरणे असा संच विकत घेण्यासाठी तुम्हाला साधारण ९०० रुपये मोजावे लागतील. कॉटन सोवळे नाडी आणि इलास्टिक अशा दोनही प्रकारांमध्ये उपलब्ध असते. त्यामुळे आपल्या मापाचे सोवळे मिळेल का, असा प्रश्न मनात उद्भवण्याची गरज नाही. साधारण उंचीला ही सोवळी ३८ इंचांची असतात, परंतु उंचीनुसार दुकानात ती कमी-जास्त करून मिळतात. लहान मुलांसाठीही खास अशा प्रकारची सोवळी असतात. लहान मुलांच्या मापानुसारही सोवळी खास शिवून मिळतात.

loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips in marathi
UPSC ची तयारी : भारतीय राज्यव्यवस्था – मूलभूत हक्क, मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये
Archaeological Survey of India
विश्लेषण: भारतीय संस्कृती संबंधित १८ स्मारके चक्क गायब! भारतीय पुरातत्त्व खातं याला किती जबाबदार?

बेळगाव सिल्क सोवळे
बेळगाव सिल्क सोवळे कॅटलॉन पॉलिस्टर या कापडाच्या प्रकारापासून बनविण्यात येते. लाल, नारिंगी, जांभळा, मरून, क्रीम, मजेंडा, पिवळा, भगवा आदी रंगांमध्ये ही सोवळे बाजारात उपलब्ध आहेत. बेळगाव सिल्क सोवळ्यांबरोबरही उपरणे घेण्याची पद्धत आहे. बेळगाव सिल्क सोवळे आणि उपरण असा संच घेतल्यास तुम्हाला ७०० रुपये मोजावे लागतील.

हाफ सिल्क सोवळे
हाफ सिल्क सोवळे सिल्क आणि पॉलिस्टर यांच्या मिश्रणातून तयार होते. हाफ सिल्क सोवळ्याला ‘साऊथ सिल्क’ या नावानेही ओळखले जाते. नारिंगी, लाल, पिवळा, मँगो (आंबा), भगवा, जांभळा, राणी, क्रीम, स्कीन कलर, जर्मन ब्ल्यू, मरून अशा विविध रंगांमध्ये हे सोवळे उपलब्ध आहे. हाफ सिल्क सोवळे आणि उपरणे असा एकत्रित संच बाजारात उपलब्ध आहे. या संचासाठी तुम्हाला १४०० रुपये मोजावे लागतील.

प्युअर सिल्क
प्युअर सिल्क हा प्रकार मुख्यत: पारंपरिक सोवळ्यामध्ये पाहायला मिळतो. पूर्णत: सिल्कचा वापर आणि उत्तम दर्जा यासाठी प्युअर सिल्क ओळखले जाते. इतर सोवळ्यांच्या मानाने प्युअर सिल्कची किंमत जास्त असते. ग्राहकांच्या मागणीनुसार प्युअर सिल्क कापडात ‘इंडो-वेस्टर्न’ सोवळी शिवून मिळतात.

नक्षीदार सोवळी
सोवळ्याच्या काठावर वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम केलेली अशी भरीव सोवळीही बाजारात पाहायला मिळतात. परंतु ही सोवळी खास लग्न किंवा मोठे समारंभ डोळ्यासमोर ठेवून तयार केली जातात. त्यामुळे त्यांची किंमत हजारांच्या घरात पाहायला मिळते. या सोवळ्यांवर भरीव नक्षीकाम केलेला कुर्ता, शेरवानी घालण्याची पद्धत आहे.
सोवळी मिळण्याचे ठिकाण : ’समर्थ भांडार, गोखले रोड, नौपाडा, ठाणे (प.)