07 July 2020

News Flash

करोनामुळे ‘फास्ट फूड’ विक्रेत्यांवरच उपासमारीची वेळ

करोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ

करोनाचे संकट आणि टाळेबंदीमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ

मयूर ठाकूर, लोकसत्ता

भाईंदर : मीरा-भाईंदर शहरातील धावपळीच्या वातावरणात झटपट अन्नपदार्थ उपलब्ध करून देणाऱ्या शेकडो फास्ट फूड विक्रेत्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. करोनामुळे विस्कळीत झालेले जीवन त्याचबरोबर आरोग्यविषयी नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती पाहता भविष्यातदेखील आपला व्यवसाय सुखरूप नसल्याची भावना या विक्रेयाच्या मनात निर्माण झाली आहे.

मुबंईसह,  ठाणे, मीरा-भाईंदर आणि वसई-विरार शहरांत मोठय़ा प्रमाणात असलेली नागरीवस्ती आणि नोकरदार वर्ग फिरत असतो. त्यामुळे झटपट मिळणाऱ्या अन्न पदार्थातून भूक भागवणाऱ्या पदार्थाची मागणी अधिक आहे. या भागात पाणीपुरी, सँडविच, वडापाव, भाजी पाव, आणि चायनिज अशा ‘फास्ट फूड’ विक्री करणाऱ्या विक्रेत्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. हे विक्रते रस्त्याच्या कडेला अथवा एखाद्या दुकानात या पदार्थाची विक्री करून आपली उपजीविका भागवत होते. परंतु करोनाचे संकट डोक्यावर आल्यामुळे राज्यात टाळेबंदी नियम लागू करण्यात आला. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या या वर्गावर कर्जबाजारी होऊन उपासमारीची वेळ आली आहे.

टाळेबंदीत शिथिलता आणण्यात आली असली तरी रस्त्याच्या कडेला तसेच दुकानात गर्दी होऊ  नये म्हणून राज्य शासनाकडून खाद्य पदार्थ विक्रीस बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे उत्पन्नाचा स्रोतच  बंद पडला गेल्यामुळे अनेक ‘फास्ट फूड’ विक्रेते कामाच्या शोधात फिरत आहे. तर गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेल्या दुकानाच्या भाडय़ाचा बोजा उचलून कर्जबाजारी झाले आहेत.  शिवाय नागरिकांमध्ये बाहेरील खाद्यपदार्थाविषयी निर्माण झालेली नकारात्मक भूमिका भविष्यातदेखील आपल्याला हानी पोहचवू शकते, अशी भीती या विक्रेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. या परिस्थितीमुळे या व्यवसायाला कायमचे रामराम करण्याखेरीज दुसरा पर्याय नसल्याची प्रतिक्रिया या विक्रेत्यांकडून देण्यात येत आहे.

घरपोच सुविधेला सोसायटीचा विरोध

हे विक्रते रस्त्याच्या कडेला अथवा एखाद्या दुकानात या पदार्थाची विक्री करून आपली उपजीविका भागवत होते. करोनामुळे पूर्णत: कामं बंद झाल्यामुळे अनेक ‘फास्ट फूड’ विक्रेते स्वत: ग्राहकांच्या मागणीनुसार त्यांना घरपोच सुविधा देण्याचे काम करत होते. परंतु बाहेरील व्यक्ती तसेच खाद्यपदार्थ घेऊन गृहसंकुलात येत असल्यामुळे अनेक सोसायटी पदाधिकाऱ्यांकडून अशा विक्रेत्यास बंदी घालण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे घरपोच सुविधा देण्याच्या पर्यायाला देखील ग्रहण लागत असल्यामुळे आता कोणताच पर्याय या फास्ट फूड विक्रेत्यांपुढे राहिलेला नाही आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून दाबेली आणि सँडविच विक्रीचे काम करत आहे.माझ्या कुटुंबीयांचा खर्च त्यातून भागवला जात होता. परंतु आता माझे उत्पन्नच बंद झाल्यामुळे उपाशी राहायची वेळ माझ्या कुटुंबीयांवर आली आहे.

– अभिषेक, ‘फास्ट फूड’ विक्रेता

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 2:28 am

Web Title: fast food vendors suffering huge losses due to coronavirus zws 70
Next Stories
1 संकटातही ‘वाहन’सोस
2 मीरा-भाईंदरमधील करोनामुक्त रुग्णांची संख्या सर्वाधिक
3 बदलापुरात २१ जणांना करोनाची लागण, रुग्णसंख्या ७४२ वर
Just Now!
X