News Flash

आता ‘उपवास’ही खिशाला सोसवेना!

आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या चातुर्मासात अनेक दिवस उपवास पाळले जातात.

शेंगदाणे, वरी, साबुदाणे, रताळ्याच्या भावात दीडपट वाढ

व्यापाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे महाग झालेल्या भाज्या, टंचाईमुळे खिशाला बोजड ठरू लागलेल्या डाळी आणि अन्य धान्यांच्या किमतीनी सर्वसामान्यांचा आहार महाग केला असताना आता उपवासही खिशाला सोसवेनासा झाला आहे. शुक्रवारी येत असलेली आषाढी एकादशी, त्यानंतर सुरू होणारा चातुर्मास असा व्रतवैकल्यांचा कालखंड सुरू होत असताना साबुदाणे, शेंगदाणे, वरीचे तांदूळ, रताळी अशा सर्वच जिनसांचे दर गगनाला भिडले आहेत.  किरकोळ बाजारात सध्या शेंगदाणे १३० रुपये किलो असून साबुदाण्याचे दरही  ६० ते ७० रुपये किलो इतके चढे आहेत. वरीच्या तांदळानेही शंभरी गाठली असून त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तर रताळय़ाचा दर ९० रुपये किलोवर पोहोचला आहे.

आषाढी एकादशीनंतर सुरू होणाऱ्या चातुर्मासात अनेक दिवस उपवास पाळले जातात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थामधील जिनसांच्या किमती वाढतात. मात्र, यंदा हा काळ सुरू होण्याआधीच जिन्नस महाग झाले आहेत. अपुऱ्या पावसामुळे गेल्या वर्षी पिकांवर परिणाम होऊन रताळी, शेंगदाणे आदी उपवासाच्या पदार्थाची आवक रोडावली आहे. बाजार समित्यांचा संप हा ‘दुष्काळात तेरावा’ अशी परिस्थिती आहे. तामिळनाडूत मात्र नेमकी उलट परिस्थिती आहे. जास्त पावसामुळे साबुदाण्याच्या उत्पन्नावर त्याचा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळे गेल्या महिन्यात ४० रुपये किलो असणाऱ्या साबुदाण्याचा भाव ६० ते ७० रुपयांच्या घरात गेला आहे. वरीच्या तांदळानेही शंभरी गाठली आहे. होलसेल बाजारात शेंगदाण्याचा भाव हा ९० ते १०० रुपये किलो आहे. तोच भाव किरकोळ बाजारात १३० रुपये किलोच्या घरात असल्याचे वैभव ट्रेडर्सचे शांतीभाई जैन यांनी सांगितले.

फळांवरही महागाईचे सावट  

रमजानमुळे फळांच्या भावात आधीच वीस ते पंचवीस रुपयांनी वाढ झाली होती. सध्या सफरचंद १६० ते २४० रुपये किलो आहे. आलुबुखार हे २०० रुपये किलो आहेत. साधी केळी ४० ते ६० रुपये डझन तर वेलची केळी ९० रुपये किलोने विकली जात असल्याचे विक्रेते योगेश मोढगे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:49 am

Web Title: fasting food is also expensive
Next Stories
1 मधल्या सुट्टीत विद्यार्थ्यांना पोळीभाजीऐवजी जंक फूड
2 शहरातील रस्त्यांवर आठशेहून अधिक खड्डे
3 दिव्यात विजेसह बिलांचाही ‘धक्का’
Just Now!
X