कोकण आणि नारळ हे जणू काही समीकरणच. कोकणी माणसाच्या घरात बनलेल्या प्रत्येक पदार्थात ओल्या नारळाचा सढळ हाताने वापर झालेला आपल्याला जाणवल्याशिवाय राहत नाही. अगदी भाजी, आमटी, उसळ, कालवण अशा विविध पदार्थामध्ये ओल्या नारळाचा वापर झालेला आपल्याला पाहायला मिळतो. स्वयंपाकातील हाच प्रमुख खाद्यघटक कल्याणच्या कै. भिकाजी यशवंत ताम्हणकर यांनी न्याहरीच्या पदार्थामध्ये अतिशय चपखलपणे वापरला. ओल्या नारळाचा वापर ‘कचोरी’मध्ये करीत त्यांनी कल्याणात १९६० मध्ये ‘उपवासाच्या कचोरी’ (ओल्या नारळाची कचोरी)चा श्रीगणेशा केला. ६० च्या दशकात ताम्हणकर यांनी जुन्या कल्याणातील पारनाक्यावरील दाजी लेले वाडय़ात आपल्या खाद्य व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीच्या काळात बटाटा भजी, मेथी भजी, बटाटा वडा आदी खाद्यपदार्थ दुकानात मिळत असत. साधारण महिन्याभरानंतर त्यांनी उपवासाची कचोरी विकण्यास सुरुवात केली. तेव्हा या कचोरीची किंमत ६ नवे पैसे इतकी होती. काही दिवसांनी कल्याणातील सुभेदारवाडा शाळेतील शारदोत्सवात प्रत्येकी अडीच हजार बटाटा वडे आणि कचोऱ्यांची ऑर्डर ताम्हणकर यांना मिळाली. शारदोत्सवात आलेल्या नागरिकांना आणि मान्यवरांना ताम्हणकरांची कचोरी आवडली आणि तिथून पुढे ‘ताम्हणकर आणि उपवासाची कचोरी’ हा प्रवास सुरू झाला, तो आजतागायत सुरूच आहे.

ताम्हणकर यांच्याकडे मिळणारी उपवासाची कचोरी कोंथिबीर, ओले खोबरे, शेंगदाण्याचा कूट, मिरची ठेचा, लिंबू, आले, साखर, मीठ आदी खाद्यघटकांच्या मिश्रणातून तयार केली जाते. या सारणावर बटाटय़ाचे आवरण चढवून ती गरम तेलात अलगदपणे सोडली जाते. सारणामध्ये ओले खोबरे असल्याने या कचोरीला अलगदपणेच हाताळावे लागते, नाही तर ती फुटून त्यातील सारण बाहेर येण्याची शक्यता असते. तेलातून काढल्यानंतर गडद तपकिरी रंग प्राप्त झालेली कचोरी खवय्यांसमोर पेश केली जाते. अन्य ठिकाणी मिळणाऱ्या कचोरीमध्ये ओले खोबरे नसते. त्याचप्रमाणे इतर दुकानांमधील कचोरीचे आवरण बटाटय़ाचे नसून मैद्याचे असते, असे ७४ वर्षीय यशवंत भिकाजी ताम्हणकर सांगतात. ताम्हणकरांकडील कचोरीसाठी वापरले जाणारे बटाटे, कचोरी बनविताना बटाटे शिजविण्याची पद्धत आणि अन्य गोष्टींमुळे ही कचोरी खुसखुशीत राहण्यासाठी मदत होते. गरमागरम कचोरीचा पहिला घास दाताने तोडतानाच आपल्याला कचोरीचा खुसखुशीतपणा जाणवतो. बुंदीच्या लाडवाच्या आकाराची असणारी ही कचोरी चवीला मध्यम तिखट लागते. खवय्यांच्या पसंतीनुसार कचोरी अधिक तिखट, गोडही करून मिळते. कचोरीसाठी उत्तम दर्जाचे खाद्यघटक, तेल वापरले जातात. त्यामध्ये कधीही तडजोड करीत नाही, असे ताम्हणकर सांगतात. ताम्हणकर यांच्याकडील ग्राहकांचा कल दुकानावर येऊन कचोरी खाण्यापेक्षा मोठी ऑर्डर देऊन घरी घेऊन जाण्याकडे अधिक आहे. कचोरीच्या पूर्वतयारीपासून ते कचोरी तळून तयार होईपर्यंत चार तासांचा अवधी लागतो. त्यामुळेच आत्ता कचोरीची ऑर्डर दिली आणि दुसऱ्या क्षणाला कचोरी तयार, असे कधीही होत नाही.

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…
Indian youth abroad
भारतीय तरुणांना परदेशात डांबून ठेवणाऱ्यांना अटक

उपवासाच्या कचोरीबरोबरच ताम्हणकरांकडे मिळणारा ‘मसाला केळी’ हा पदार्थही विशेष लोकप्रिय आहे. अंगारकी चतुर्थी, महाशिवरात्र, कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी, श्रावणी सोमवार या ठरावीक दिवशीच हा पदार्थ मिळतो. मसाला केळीसाठी केळ्याचे चार काप केले जातात. त्यामध्ये कचोरीचा मसाला, बेदाणे, खसखस, साखरेचा पाक (दूध आणि लिंबासहित) आदी जिन्नस टाकले जातात. मसाला केळी या पदार्थाला साखरेच्या पाकामुळे गोड चव असते. परंतु कचोरीच्या मसाल्यामुळे मसाला केळ्याला आंबट, तिखट चव प्राप्त होते. मसाला केळी या पदार्थाचे खवय्येही तसे ठरलेले आहेत. ताम्हणकर यांच्याकडे कचोरी खाण्यासाठी कल्याणबरोबरच भिवंडी, ठाणे, डोंबिवली अशा विविध शहरांतून खवय्ये येत असतात. अन्य शहरांमध्ये अशी कचोरी खायला मिळत नसल्याने ते खास या ठिकाणी येत असतात. कचोरी, मसाला केळी, बटाटा वडा तर उपवासाच्या दिवशी साबुदाणा वडाही या ठिकाणी मिळतो.

कै. भिकाजी यशवंत ताम्हणकर यांनी सुरू केलेला हा व्यवसाय आज त्यांचे ७४ वर्षीय पुत्र यशवंत भिकाजी ताम्हणकर समर्थपणे चालवीत आहेत. त्यांना या व्यवसायात त्यांची पत्नी शोभना ताम्हणकर, मुलगा सचिन ताम्हणकर, सून सुचिता ताम्हणकर मदत करीत आहेत. इतकेच नव्हे तर कचोरी वळण्याचे काम त्यांच्या नाती वेदिका आणि रियाही करीत असतात.

ताम्हणकर यांचे ‘गणेश भुवन’

पत्ता- शिवतीर्थ अपार्टमेंट (जुना लेले वाडा), पारनाका, कल्याण (प)