आईविषयी सर्वच लिहितात पण वडिलांबद्दल कुणीच काही लिहीत नाही, असे सर्वसामान्यांचे म्हणणे असते. रविवारी संपूर्ण जगात पितृ दिन अर्थात ‘फादर्स डे’ साजरा करण्यात आला. आपले अवघे आयुष्य स्वत:साठी नव्हे तर कुटुंबासाठी खर्ची घालणारा ‘बाप माणसाच्या कर्तृत्वाला सलाम ठोकण्यासाठी पितृदिनानिमित्त टिटवाळ्यातील ललित ग्रंथालयाने वडिलांच्या विविध पैलूंचे प्रदर्शनाद्वारे दर्शन घडवले.
संत साहित्याच्या आधारे त्या काळातील वडिलांचे दर्शन या प्रदर्शानातून रसिकांना अनुभवता आले. तसेच आधुनिक काळातील वडिलांच्या विविध छटा या वेळी प्रदर्शनातून मांडण्यात आल्या होत्या. वडिलांच्या विविधांगी माहितीचे वाचन या प्रदर्शनातून रसिकांना करण्यात आले. या निमित्ताने टिटवाळ्यातील दहा वडीलधाऱ्या व्यक्तींना भेट देऊन त्यांचा ग्रंथालयातर्फे सत्कार करण्यात आला. त्यामध्ये रमेशकुमार प्रजापती, विनोद देवरे, महेंद्र गोयल, बाळाराम जाधव, प्रमोद दलाल, सुनील जोशी, नारायण देशमुख, सुरेश भोईर, सोनू दिनकर आणि वामन रंबाडे या सर्व मान्यवर व्यक्तींना पितृदिनानिमित्त गौरविण्यात आले. भ्रष्टाचारापासून अलिप्त, कामावर प्रचंड निष्ठा, सामाजिक समरसता आदीं गोष्टी लक्षात ठेवून या दहा व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात आली आहे. तरुण पिढीने अशा व्यक्तींना आदर्श मानून आपल्या पुढील जीवनाची वाटचाल करावी, अशी आशा नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर व्यक्त केली.