नाटय़दिग्दर्शक विजू माने यांचा अनुभव

ठाणे : विविध दुर्घटना आणि वारंवार होणाऱ्या बिघाडांमुळे चर्चेत असणारे डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नाटय़गृहात असलेल्या उद्वाहनात सोमवारी अचानक बिघाड झाल्याने दिग्दर्शक विजू माने हे अर्धा तास अडकून पडले होते. त्या वेळी आलेला अनुभव विजू माने यांनी फेसबुकवरून मांडला व घाणेकर नाटय़गृहाच्या व्यवस्थापनाविरोधात रोष व्यक्त केला.

नाटय़गृहाच्या लघुप्रेक्षागृहात सोमवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयातर्फे वार्षिक स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विजू माने यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या एका स्वयंसेवकासोबत विजू माने नाटय़गृहाच्या उद्वाहनाने येत असताना अचानक ते बंद पडले व त्यातून मोठा आवाज येऊ लागला. माने यांनी आपत्कालीन कळ दाबल्यानंतर सुरक्षारक्षकांनी धाव घेऊन विद्युतप्रवाह बंद केला. मात्र, उद्वाहन मध्यावर आणून माने व इतरांची सुटका होईपर्यंत अर्धा तास गेला.

श्वास गुदमरून टाकणाऱ्या या घटनेचे कथन विजू माने फेसबुकवरील एका पोस्टमधून केले व नाटय़गृह व्यवस्थापनावर नाराजीही व्यक्त केली. या घटनेबाबत बाबत अधिक माहितीसाठी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.

याआधीही तक्रारी

* घोडबंदर भागातील नागरिकांची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी काही वर्षांपूर्वी डॉ. काशिनाथ घाणेकर नाटय़गृह उभारण्यात आले. दुरुस्तीच्या कामासाठी हे नाटय़गृह सातत्याने बंद ठेवावे लागत असल्याचे प्रकार वारंवार समोर आले आहेत.

* २०१६ मध्ये नाटय़गृहाच्या छताचे प्लॅस्टर कोसळले होते.

गेल्या वर्षी नाटय़गृहातील लघू प्रेक्षागृहाच्या छतातून पाणी गळती होत होती.

* जुलै महिन्यात अभिनेते भरत जाधव यांच्या ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकाच्या प्रयोगादरम्यान नाटय़गृहाची वातानुकूलित यंत्रणा बंद पडली होती.

डॉ. काशिनाथ नाटय़गृहाच्या दुरवस्थेबाबत महापालिका प्रशासनाला वारंवार पत्रव्यवहार केला असून नाटय़गृहात कोणतीही सुधारणा झालेली नाही. महापालिकेवर सध्या महापौर असलेले नरेश म्हस्के हे स्वत: कलाकार आहेत. त्यांनी तरी निदान नाटय़गृहाकडे लक्ष द्यावे.

– विजू माने, नाटय़ आणि सिने दिग्दर्शक