ठाणे शहरात नव्याने उभ्या राहात असलेल्या गृहसंकुलांमधील तीन हजारांहून अधिक घरे रुग्णांचे अलगीकरण तसेच उपचारासाठी अधिग्रहित करण्याचा महापालिका प्रशासनाचा निर्णय आधीच मंदीची झळ सोसत असलेल्या बांधकाम क्षेत्रातील व्यावसायिकांना धडकी भरवू लागला आहे. करोनाचे संकट संपताच घरांचा ताबा दिला जाईल, असा शब्द विकासकांनी दिला असताना कोविड केंद्राची ही टांगती तलवार किती महिने सोसावी लागेल,  अशी चिंता घरमालकांना आहे. विशेष म्हणजे, महापालिकेच्या या निर्णयामुळे प्रकल्पामधील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या घरांवरही गंडांतर येईल, अशी भीती व्यावसायिकांना सतावू लागली आहे.

ठाणे शहरात करोनाबाधितांची संख्या वाढू लागल्याने महापालिकेने ताबा देण्यासाठी तयार असलेली आणि सुविधांनी सज्ज असलेली गृहसंकुले अधिग्रहित करण्याचा निर्णय घेतला असून येत्या काही दिवसात शहराच्या वेगवेगळ्या भागातील ३४०० घरे कोविड केंद्रात रूपांतरित करण्याची तयारी करण्यात आली आहे. दिवा परिसरातील बेतिवडे भागातील रुनवाल बिल्डरच्या माय सिटी प्रकल्पातील घरांमध्ये विलगीकरण केंद्राच्या उभारणीची पूर्वतयारी करण्यास गेलेल्या महापालिकेच्या पथकाला सोमवारी स्थानिक रहिवाशांच्या विरोधाचा सामना करावा लागला.

मुंबई, ठाण्यातील बांधकाम व्यावसायिक महापालिकेच्या या धोरणामुळे धास्तावले आहेत. बांधकाम क्षेत्रात मंदी  असली तरी ठाण्यातील घोडबंदर तसेच कल्याण-शिळ मार्गावर मोठय़ा विकासकांच्या स्वतंत्र नागरी वसाहतींची (टाऊनशिप) कामे वेगाने सुरू आहेत. एका गृहसंकुलात अनेक लहान-लहान संकुलांची निर्मिती करत असताना महापालिकेकडून बांधकाम परवानगी आणि भोगवटा प्रमाणपत्रही टप्प्याटप्प्याने घेतले जाते. घोडबंदर तसेच कल्याण-शिळ मार्गालगत वसाहतींमधील शिल्लक घरांच्या विक्रीवर महापालिकेच्या या धोरणाचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी भीती ठाण्यातील एका विकासकाने व्यक्त केली. महापालिका कोविड केंद्रासाठी अधिग्रहित करत असलेली सर्वच घरे विकली गेलेली नाहीत. एखाद्या इमारतीत कोविड केंद्र उभारले गेल्यास भविष्यात उपलब्ध  घरांच्या विक्रीला मोठा फटका बसेल असे या विकासकाने सांगितले.

ग्राहकांची सरकारकडे मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे आणि महापालिका आयुक्तांकडे आम्ही यासंबंधी वारंवार तक्रारी नोंदवीत असून लाखो रुपये मोजून खरेदी केलेल्या घरांमध्ये आम्हाला प्रवेश करू द्या, असे आर्जव करत आहोत. दिवा भागातील एका गृहप्रकल्पातील खरेदीदारांनी समाजमाध्यमांद्वारे केले आहेत. ठाणे शहरात म्हाडा तसेच झोपडपट्टी पुनर्विकास योजनेच्या माध्यमातून काही इमारतींची उभारणी करण्यात आली असून त्या ठिकाणी अशी केंद्रे उभारली जावीत, अशी मागणी भाजपचे घोडबंदर भागाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी केली आहे. दरम्यान, करोना रुग्णांची संख्या लक्षात घेता भविष्यातील तरतूद म्हणून या इमारतींच्या अधिग्रहणाशिवाय पर्याय नाही, अशी प्रतिक्रिया अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.