गेल्या काही वर्षांत डोंबिवली शहराचा विस्तार आणि लोकसंख्या कैकपटीने वाढली आहे. मात्र त्या तुलनेत पायाभूत सुविधांच्या विकास योजना मार्गी लागल्या नाहीत. त्यामुळे अनेक सुविधांची बोंब दिसून येते. टपाल कार्यालयेही त्याला अपवाद नाहीत. शहरातील टपाल कार्यालयांची दुरवस्था झाली असून येथील कर्मचारी व येथे कामानिमित्त येणारे नागरिक जीव मुठीत धरूनच काम करतात. डोंबिवली शहरात टिळकनगर, रामनगर, विष्णूनगर, मानपाडा, डोंबिवली आणि एमआयडीसी परिसर अशी एकूण सहा टपाल कार्यालये आहेत. ेसर्व कार्यालयांची अवस्था अत्यंत बिकट आहे. इमारती मोडकळीस आल्या असून दोन टपालांच्या इमारतींचा काही भाग कोसळल्याने पालिका प्रशासनाच्या मदतीने ही टपाल कार्यालये तात्पुरत्या स्वरूपात इतरत्र स्थलांतरित करण्यात आली आहेत.
लोकसंख्या वाढल्याने प्रभाग रचनेत बदल होत गेले, मात्र शहरातील टपाल कार्यालयांची संख्या मात्र वाढली नाही. परिणामी या टपाल कार्यालयांवर दिवसेंदिवस अधिकाधिक लोकसंख्येचा भार येऊन पडला. टपाल कार्यालयात नागरिक मासिक प्राप्ती योजनेचे व्याज घ्यायला येतात. अनेक ज्येष्ठ नागरिकांनी सुरक्षितता लक्षात घेऊन आपली आयुष्यभराची मिळकत टपाल कार्यालयात गुंतवली आहे. त्यावर मिळणाऱ्या व्याजावर त्यांची गुजराण सुरू असते. तसेच स्पीडपोस्ट, रजिस्टर पत्रे पाठविण्यासाठी, टेलिफोन बिले भरण्यासाठी, विमा भरण्यासाठी आजही येतात. कामकाजाचे संगणकीकरण करण्याचे काम सुरू आहे. सर्व टपाल कार्यालये इंटरनेटच्या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र या कामांमुळे नागरिकांची कामे गेली अनेक महिने खोळंबून राहिली आहेत. टपाल कर्मचाऱ्यांना इंटरनेटचे प्रशिक्षण नसल्याने त्यांनाही ही कामे करण्यात अनेक अडचणी येत आहेत.
टिळकनगर
या टपाल कार्यालयाच्या इमारतीचीही दुरवस्था असून येथील इंटरनेट सुविधा गेल्या अनेक महिन्यांपासून सुरळीत नसल्याने नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला आहे. उभे राहण्यासही जागा नाही. छताची दुरवस्था झाली आहे. पत्र व कागदपत्रांचा ढीग साचलेला आहे. नागरिकांना बाहेर रस्त्यावर रांग लावून उभे राहावे लागते. बसण्याची सोय नाही, स्वच्छतागृह नाही. अपुरा कर्मचारी वर्ग, जुने संगणक व इंटरनेट सुविधांचा बोजवारा उडाला आहे. सकाळी चार वाजल्यापासून नागरिक रांगेत उभे राहात आहेत. मात्र तरीही त्यांची दहा ते पंधरा दिवस कामे होत नाहीत. नागरिकांनी येथील असुविधांविषयी वारंवार अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या आहेत, परंतु त्यांना केवळ उडवाउडवीची उत्तरे मिळाली आहेत.
रामनगर
पूर्वेतील दत्तनगरमधील रामनगर टपाल कार्यालय १० बाय २०च्या एका चौकोनी गाळ्यात आहे. या ठिकाणी चार-पाच कर्मचारी कार्यरत आहेत. वरच्या माळ्यावरील रहिवाशांच्या शौचालय, स्नानगृहातील पाणी सतत ठिबकत असते. या सांडपाण्यापासून बचाव करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी छताला ताडपत्री लावली आहे. मध्यंतरी येथील छताचा भागही कोसळला होता. टपाल कार्यालयातील फाइल्स ठेवायला, बसायला जागा नाही. आरडी व इतर एजंटांची गर्दी, अशा वातावरणात येथील कर्मचारी कार्यरत आहेत. या टपाल कार्यालयात पाणी पिण्याची, प्रसाधनगृहाची कोणतीही सुविधा नाही. रस्त्यावरील सार्वजनिक प्रसाधनगृहात कर्मचाऱ्यांना जावे लागते.
डोंबिवली शहर
मदन ठाकरे चौकातील टपाल कार्यालय हे डोंबिवलीतील सर्वात पहिले टपाल कार्यालय आहे. अत्यंत अपुऱ्या जागेत आणि कोंदट वातावरणात हे कार्यालय आहे. खिडक्यांची तुटलेली तावदाने, आडोसा म्हणून लावलेल्या ताडपत्र्या असे चित्र या दिसते. वीजप्रवाह खंडित झाल्यास येथील कर्मचारी मेणबत्ती लावून काम करतात.
मानपाडा
मानपाडा टपाल कार्यालय प्रीमिअर कंपनीच्या बाजूला म्हाडाच्या वसाहतीत होते. प्रीमिअर कंपनी तेजीत असताना १९७० मध्ये या कंपनी आणि परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी कार्यान्वित करण्यात आले. मात्र पुढे कंपनी बंद पडली आणि कार्यालयाला अवकळा आली. या इमारतीची एकदाही डागडुजी करण्यात आली नसल्याने भग्नावशेषाप्रमाणे ही इमारत उभी आहे. कार्यालयातील भिंतींचे रंग उडालेले, प्लॅस्टर पडलेले, डोक्यावरचे छत कधी कोसळेल याची शाश्वती नाही. शौचालयात विजेची, पाण्याची सोय नाही, कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्याची सोय नाही अशा अनेक अडचणींचा सामना येथील कर्मचारी व नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून करत आहेत. कल्याण शिळफाटा रस्त्यालगत हे कार्यालय असल्याने येथे नेहमी चोरीच्या घटना घडायच्या. अशा अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर सध्या हे टपाल कार्यालय गांधीनगर येथे हलविण्यात आले आहे.

नव्या इमारतीत तरी सुविधा द्या!
डोंबिवली पश्चिमेतील विष्णूनगर टपाल कार्यालयाची इमारत पूर्णत: मोडकळीस आल्याने सुरुवातीला ते पूर्वेतील मदन ठाकरे चौकातील जागेत हलविण्यात आले होते. पश्चिमेतील जवळपास सात साडेसात लाख लोकांना या कारणाने नाहक मनस्ताप होत होता. अखेर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पत्रव्यवहार करून पालिकेला टपाल कार्यालयासाठी जागा देण्याची विनंती केली. त्यानुसार पश्चिम विभागातील उमेशनगर येथील पालिकेच्या अखत्यारित असलेल्या शॉपिंग सेंटरमधील जागा दरमहा ९९ हजार ६१४ भाडेतत्त्वावर दोन वर्षांच्या कालावधीसाठी देण्याचे ठरविले आहे. कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी, इंटरनेटची बोंब, पिण्याचे पाणीही येथे उपलब्ध नाही. विष्णूनगर येथील इमारत नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यानंतर येथील टपाल व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा ग्राहक बाळगून आहेत.