thlogo05मालमत्ता आणि पैसाअडका पाहून एखाद्याची नजर फिरली की ती व्यक्ती त्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. अशी व्यक्ती केवळ जवळची नातेवाईक अथवा मित्रच नव्हे तर आयुष्यभराची सहचारिणी असणारी पत्नीही असू शकते. भिवंडीतील कासारआळी भागात याचाच प्रत्यय देणारी घटना महिनाभरापूर्वी घडली.
भिवंडी येथील कासारआळी भागातील आनंद सागर इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहाणाऱ्या दिलीप जैन यांच्या घरात मध्यरात्री तीन दरोडेखोर शिरले. या दरोडेखोरांनी दिलीप यांची पत्नी पायलचे हात व तोंड साडीने बांधले आणि दिलीप यांच्या डोक्यात लोखंडी रॉडने प्रहार केले. या घटनेनंतर दरोडेखोरांनी त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा सव्वा लाखांचा ऐवज लुटून नेला. काही वेळाने पायलने स्वत:ची सुटका केली आणि मदतीसाठी जोरजोराने याचना करू लागली. तिच्या आवाजाने शेजारी जागे झाले व त्यांनी मदतीसाठी त्यांच्याकडे धाव घेतली. पण रक्तबंबाळ अवस्थेत पडलेले दिलीप यांचा शेजारी येण्यापूर्वीच मृत्यू झाला होता. या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला होता. या घटनेची माहिती मिळताच निजामपुरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पायलने घडलेला प्रकार सांगताच पोलिसांनी तिची तक्रार नोंदवून घेतली आणि याप्रकरणी खून व दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला.
ठाण्याचे सहपोलीस आयुक्त व्ही.व्ही.लक्ष्मीनारायण यांनी घटनास्थळी भेट देऊन याप्रकरणी भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेला तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस उपायुक्त पराग मणेरे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस.आर.नगरकर यांनी तपासाला सुरुवात केली. तसेच या तपासासाठी महिला साहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस.बागुल, साहाय्यक पोलीस निरीक्षक एस.व्ही.निगडे आदींचे पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनेसंबंधी पायलकडे पुन्हा चौकशी केली असता, तिच्या बोलण्यामध्ये काही तफावत असल्याचे निदर्शनास आले. मात्र या घटनेमुळे ती भेदरली असल्याने माहितीमध्ये तफावत आली असावी, असे पोलिसांना वाटले.  या तपासादरम्यान एका इमारतीजवळ पोलिसांना सीसीटीव्ही कॅमेरा आढळून आला. त्यामुळे पोलिसांनी कॅमेऱ्यातील चित्रीकरण तपासले असता, त्यामध्ये तीन संशयित व्यक्ती आढळून आले. त्यांच्या पेहरावावरून ते राजस्थानी असल्याचा संशय पोलिसांना आला. म्हणून त्यांच्या शोधासाठी पोलिसांचे पथक राजस्थानला रवाना झाले. तिथल्या सुमारे ७० पोलीस ठाण्यांमध्ये चौकशी करूनही पोलिसांच्या हाती काही लागले नाही. त्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील एका वृत्तपत्रात तिघांची बातमी दिली. ती वाचून एका नागरिकाने पोलिसांना संपर्क साधला आणि तिघेजण ठाणे शहरातील राबोडी भागात असल्याची माहिती दिली. इथेच तपासाला खऱ्या अर्थाने दिशा मिळाली.
या तिघांपैकी रतनलाल मुलचंद कोठारी आणि सोहनसिंग हेमंतसिंग राजपूत हे दोघे राबोडी येथील एका किराणा मालाच्या दुकानात काम करत होते, अशी माहिती पोलिसांना मिळाली. मात्र काही दिवसांपूर्वीच त्यांनी काम सोडले. त्यानंतर पोलिसांनी दहिसर आणि नालासोपारा भागातील दोघांचे घरांचे पत्ते शोधून काढले आणि तेथे सापळा रचून दोघांना अटक केली. त्यांच्या चौकशीतून मिळालेली माहिती पोलिसांना हादरवणारी ठरली.
जैन यांच्या घरातील मोलकरीण मंजुळादेवी गोमतीवाल हिच्या मदतीने आणि मंजुळाचा भाऊ पप्पू ऊर्फ लक्ष्मण मार्फत पायलने दिलीप यांच्या हत्येसाठी दहा लाखांची सुपारी दिली होती. पायलचे बिंग फुटताच पोलिसांनी तिला आणि मंजुळाला अटक केली. या प्रकरणाचा पुढे तपास केला असता पायलच्या कृष्णकृत्याचा हिशोबच समोर आला. दिलीप जैन यांचे भिवंडीत इलेक्ट्रिक वस्तू विक्रीचे दुकान होते. ते सावकारी धंदाही करायचे. याशिवाय राजस्थानमधील सुमेरपूर गावात त्यांची वडिलोपार्जित मालमत्ता होती. यामुळे दिलीप जैन तसे गर्भश्रीमंत होते. दिलीप आणि पायल यांचे दहा वर्षांपूर्वी लग्न झाले होते. या लग्नाला दोघांच्या घरातून विरोध होता. तरीही दोघांनी घरच्यांचा विरोध डावलून लग्न केले होते आणि भिवंडी परिसरात राहात होते. लग्नानंतर दिलीप यांनी मालमत्तेत कोणताही हिस्सा नको म्हणून वडिलांना कळविले होते. पण ही बाब पायलला समजताच तिने सासऱ्यांसोबत भांडण केले होते. यामुळे त्यांनी दिलीपच्या हिस्स्याची जमीन पायलच्या नावावर केली होती. जमीन नावावर होताच पायलने ती विकण्यासाठी जाहिरात दिली. यावरून दिलीप आणि पायल यांच्यात खटके उडू लागले होते. याच वादातून दोघेही घटस्फोटाच्या निर्णयापर्यंत पोहचले होते. तसेच दिलीपने सुमेरपूर पोलीस ठाण्यात पायलविरोधात अर्जही दिला होता. घटस्फोटानंतर दिलीपची मालमत्ता आणि पैसा आपल्याला मिळणार नाही, अशी भीती पायलला वाटत होती. यामुळे गेल्या दोन वर्षांपासून ती दिलीपची हत्या करण्यासाठी कट रचत होती. मात्र तिला हत्या करण्यासाठी मारेकरी मिळत नव्हते. अखेर तिने मोलकरीण मंजुळादेवीच्या मदतीने दिलीपच्या हत्येचा कट रचला. हत्येपूर्वी पायलने भिवंडीत मारेकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांना घराच्या दरवाज्याची बनावट चावी दिली. ठरल्याप्रमाणे तिघे घराजवळ आले पण त्यांना चावीने दरवाजा उघडता आला नाही. त्यामुळे तिघेही माघारी फिरले. पहिला बेत अयशस्वी ठरल्यामुळे पायलने दुसऱ्या दिवशी घराचा दरवाजा उघडा ठेवला आणि तिघांनी घरात शिरून दिलीपची हत्या केली.
पायलसाठी दिलीपने धुडकावलेला कौटुंबिक हिस्सा मिळवण्यासाठी पायलने सगळा बनाव रचला आणि त्याची हत्या केली. पण शेवटी तिच्याही वाटय़ाला तुरुंगवासच आला.