विश्वास नांगरे पाटील यांचे मत

तत्त्वहीन राजकारण, नैतिकतेचा अभाव, कष्टाशिवाय मिळणारी संपत्ती आदी कारणांमुळे झालेल्या सामाजिक अध:पतनामुळे सध्या महिला असुरक्षित आहेत, असे मत वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे-पाटील यांनी व्यक्त केले.
‘रोटरी क्लब ऑफ सौदामिनी’ यांच्या वतीने २६-११ मधील हुतात्म्यांना श्रद्धांजली या कार्यक्रमाचे आयोजन गुरुवारी ब्राह्मण सभागृह येथे करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विश्वास नांगरे-पाटील उपस्थित होते. नांगरे-पाटील यांनी यावेळी २६-११ च्या आठवणींना उजाळा दिला.
शांततेच्या काळामध्ये जास्त चांगले काम करा; तर युद्धाच्या काळात कमी रक्त सांडेल. जसे शांततेच्या काळात चांगला अभ्यास केला तर परीक्षेत यश मिळते, तसेच जर शांततेच्या काळात चांगली रणनिती आखली तर युद्धात विजय हमखास मिळतो. आपली बलस्थाने कोणती आहेत, आपल्या समोरच्या संधी, धोके याचे विश्लेषण करून स्वत:बद्दल माहिती असेल आणि शत्रूबद्दल माहिती नसेल तर एका विजयानंतर एक पराभव पचवावाच लागेल. तुम्हाला शत्रूबद्दल व स्वतबद्दलही माहिती नसेल तर प्रत्येक युद्धात तुम्ही सपाटून मार खाल्लाच समजा. सैन्यातील जवानांसोबतच तरुणांनीही ही त्रिसूत्री लक्षात ठेवावी, असे त्यांनी सांगितले.