करोना संसर्ग टाळण्यासाठी ठाणे जिल्हा कृषी विभागाचा पुढाकार

ठाणे : करोना संसर्गाच्या काळात जिल्ह्य़ातील शेतक ऱ्यांनी खत खरेदीसाठी गर्दी करू नये यासाठी ठाणे जिल्हा प्रशासनाच्या कृषी विभागाने थेट शेतकऱ्यांच्या बांधावर खत पुरवठा सुरू केला आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार १२३ शेतकऱ्यांच्या बांधावर १ हजार १२५.०४ मेट्रिक टन खताचा पुरवठा करण्यात आला असून या पुढेही हा उपक्रम सुरू राहणार आहे. तसेच यंदा जिल्ह्यात खरीप नियोजनाची अंमलबजावणी योग्य पद्धतीने झाल्यामुळे खताची साठेबाजी

आणि जादा विक्री करण्याचा एकही प्रकार पुढे आला नसल्याची माहिती ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.

ठाणे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामामध्ये ५९ हजार ९१०.६४ हेक्टर क्षेत्रावर भात, नाचणी, वरई  आणि डाळींच्या लागवडीचे लक्ष ठेवण्यात आले होते. त्यामुळे या लागवडीसाठी मोठय़ा प्रमाणात खतांची अवश्यकता असल्याने ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातर्फे पुरेशा प्रमाणात खत उपलब्ध होण्याचे नियोजन आखण्यात आले होते. त्यानुसार राज्याच्या कृषी विभागातर्फे सप्टेंबर महिना अखेरीपर्यंत जिल्ह्याला युरिया, डीएपी, एमओपी, एनपीके आणि एसएसपी अशी सर्व खते मिळून ११ हजार ६६० मेट्रिक टन खत मंजूर करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्ह्याला १६ जुलैपर्यंत १० हजार ४६० मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. मात्र, यंदा करोनाचे सावट असल्याने शेतकऱ्यांनी खरीप हंगामासाठी खत खरेदी करण्याकरता गर्दी केल्यास करोना संसर्ग पसरण्याची शक्यता होती. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावर खत उपलब्ध करून देण्याच्या सूचना राज्याच्या कृषी विभागाने दिल्या होत्या. त्यानुसार ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने नियोजन करून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमार्फत शेतकऱ्यांच्या बांधावर खत पोहोचवण्याचा उपक्रम हाती घेतला. १५ जुलैपर्यंत ठाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने आत्तापर्यंत १ हजार ७६ शेतकरी गटाच्या २३ हजार १२३ शेतकऱ्यांच्या बांधावर १ हजार १२५.०४ मेट्रिक टन खत सुरक्षित पोहोचवण्यात आले असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली.

जिल्ह्यात खताचा अतिरिक्त साठा

राज्याच्या कृषी विभागातर्फे यंदा जिल्ह्याला मोठय़ा प्रमाणात खताचा साठा नियोजित वेळेवर उपलब्ध करून देण्यात आला आहे. जिल्ह्याला राज्यातर्फे जुलै महिना अखेरीपर्यंत १० हजार ४६० टन खत मिळाले असून त्यापैकी ५ हजार टन खत सध्या विक्रीसाठी शिल्लक आहेत. त्याचबरोबर खरीप पिकासाठी वापरल्या जाणाऱ्या निमकोटेड खताचा जिल्ह्यात अतिरिक्त संरक्षित साठा करून देण्यासाठी महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाकडून परवानगी मिळाली आहे. त्यानुसार भिवंडी येथे ८० टन, शहापूर येथे ७० टन, अंबरनाथ येथे २० टन आणि मुरबाड येथे ३० टन असा २०० टनाचा अतिरिक्त साठा करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अंकुश माने यांनी दिली.

बांधावर खतपुरवठा (मे.टन)

तालुका        शेतकरी        खतपुरवठा

कल्याण :       ३ ,७७२         १८५.५५

अंबरनाथ :     २,४३७           ६६.२९

मुरबाड :         २,५७९          २०१.८०

शहापूर :       १०,६१८          ३८७

भिवंडी :        ३,७१७            २८४.४०