आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांचा सूर
भक्ती शेटय़े, युवा वार्ताहर
समाजातील असंवेदनशील घटनांच्या विरोधात अभिजनांनी पुरस्कार वापसीचे शस्त्र उचलण्याऐवजी शब्दांच्या माध्यमातून आपला निषेध व्यक्त करावा. साहित्यिकांच्या लेखणीचा प्रभाव समाजाला जागे करण्यासाठी पुरेसा असतो, अशा शब्दांत ‘पुरस्कार वापसी’च्या वादावर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. जोशी बेडेकर महाविद्यालयात डॉ.वा.ना.बेडेकर राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वादविवाद स्पर्धेत विद्यार्थ्यांनी ‘पुरस्कार वापसी योग्य की अयोग्य?’ या विषयावर मते मांडताना समाजभान असल्याची चुणूक दाखवून दिली.
‘‘देशात विचारवंतांची झालेली हत्या अशोभनीय आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी रवींद्रनाथ टागोरांनी सर पदवी परत करून पुरस्कार वापसीचे शस्त्र उचलले होते. त्यामुळे साहित्यिकांनी केलेली पुरस्कार वापसी योग्यच आहे,’’ असे मत विषयाच्या सकारात्मक बाजूने बोलणाऱ्या विद्यार्थ्यांनी मांडले.
विद्याप्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष डॉ. विजय बेडेकर तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांच्या मार्गदर्शनाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अलिबाग, रत्नागिरी, रायगड, सातारा, ठाणे येथील महाविद्यालयाचे विद्यार्थी यात सहभागी झाले होते. साहित्यिक कवी प्रा.दामोदर मोरे, लेखक, कादंबरीकार अरविंद दोडे आणि लेखनकार ग्रंथपाल प्रा.भरतकुमार शुक्ल यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. सहभागी १२ संघांपैकी ५ संघांना पारितोषिकांनी गौरवण्यात आले. डी.पी.भोसले, सातारा महाविद्यालयातील मिथुन माने आणि किरण कीíतकर यांना रोख रक्कम ५००० आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या प्रज्ञा पोवळे हिने द्वितीय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय महाड येथील एकनाथ गोपाळ, आनंदराज घाडगे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. रत्नागिरी येथील फिनॉलेक्स महाविद्यालयातील हृषीकेश डहाळे, भाग्यश्री पाचरेकर आणि विधी महाविद्यालयातील स्वानंद गांगल, सिद्धांत नाईक यांना उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात आली. फेस नसलेल्या फेसबुक आणि वाट नसलेल्या व्हॉट्स अ‍ॅपमधून बाहेर येऊन विद्यार्थ्यांनी अवांतर वाचन करून इतिहासातील उदाहरणांची जोड घेत स्पर्धेच्या विषयाची गांभीर्याने दखल घेतली, अशा समर्पक शब्दांत परीक्षकांनी मनोगत व्यक्त केले. सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी प्रा सुभाष शिंदे ,प्रा नारायण बारसे , प्रा विमुक्ता राजे, प्रा महेश पाटील, प्रा विनोद चंदवाणी, प्रा नितीन पागी यांचे सहकार्य लाभले.

गोवेलीत ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक
प्रशांत घोडविंदे, युवा वार्ताहर
तरुणांनी सोशल मीडियाच्या दुनियेत अडकण्यापेक्षा कर्म आणि प्रयत्न यावर भर द्यावा. शिवाजी महाराजांची धर्मनिरपेक्ष नीती, स्त्रियांना समान वागणूक देणारी नीती यांचा अवलंब करावा असे मत व्याख्याते संदीप कदम यांनी शिवजयंतीनिमित्त जीवनदीप महाविद्यालयात आयोजित ‘शिवोत्सव सोहळ्यात’ व्यक्त केले. राष्ट्रीय सेवा विभागातर्फे आयोजित शिवोत्सव सोहळ्यात संदीप कदम आणि प्रा.के.बी.कोरे यांच्या हस्ते शिवप्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची ढोल-ताश्यांच्या गजरात भव्य शिव मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत निर्मल इंग्रजी माध्यम आणि महाविद्यालयाच्या ४७० विद्यार्थ्यांनी पारंपरिक पोशाख परिधान करून सहभाग घेतला. ‘जय शिवाजी, जय भवानी’ या घोषणा देऊन संपूर्ण परिसर आणि वातावरण उत्साहाचे पाहायला मिळाले. या निमित्ताने ‘वेध इतिहासाचा’ यांच्या साहाय्याने शिवकालीन शस्त्र, मोडिलिपिक कागदपत्र, नाणी आणि शिवरायांच्या किल्ल्यांचे छायाचित्र प्रदर्शन भरवण्यात आले होते. शिवजयंतीनिमित्त आयोजित जिल्हास्तरीय पथनाटय़ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्त्रीभ्रूण हत्या, रस्ता सुरक्षा या विषयांवर विद्यार्थ्यांनी पथनाटय़ाच्या माध्यमातून आपले विचार मांडले. सोनावणे महाविद्यालयाने प्रथम, पडगा महाविद्यालयाने द्वितीय आणि समयक संकल्प महाविद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.

राष्ट्रीय परिषदेत महात्मा गांधींच्या विचारांवर मंथन
शोधनिबंध, दृक्श्राव्याच्या माध्यमातून गांधीविचारांवर चर्चा
ठाणे : आंतरिक शक्तीच्या जोरावरच माणूस आपल्यातील हिंसेवर मात करू शकतो. सध्याच्या काळातील समस्या सोडवताना महात्मा गांधींच्या विचारांचा विचार करावा लागतो, असे मत उत्तर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.बी.पाटील यांनी पेंढारकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय परिषदेत व्यक्त केले.
एकविसाव्या शतकात महात्मा गांधींच्या विचारांची समर्पकता या विषयावर पेंढारकर महाविद्यालयाच्या इतिहास विभागातर्फे दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी इतिहास विभागातर्फे प्रसिद्ध होणाऱ्या ‘मिताक्षरा’ या चौथ्या अंकाचे प्रकाशन करण्यात आले.
बनारस विद्यापीठातील डॉ. बिंदा परांजपे यांनी महात्मा गांधीजींच्या विचारांनी प्रभावित झालेल्या मीराबेन यांच्या स्वातंत्र्य चळवळीतील सहभागाचा उल्लेख केला. खेडय़ाकडे चला हा विचार पाळताना खेडय़ातील लोकांचे जीवन समृद्ध करण्यासाठी सतत प्रयत्नशील असले पाहिजे असे गांधींच्या विचाराचे अभ्यासक भुजंग बोबडे यांनी सांगितले. महात्मा गांधींचे विचार मानवकेंद्रित असल्याचे सांगून गांधीजींच्या मूल्यविरहित राजकारण, कष्टविरहित संपत्ती, विवेकाविरहित आनंद, चरित्र्यविरहित ज्ञान, नीतीविरहित वाणिज्य, मानवविरहित विज्ञान, आणि त्यागविरहित धर्म या अपप्रवृत्तींचा पुनरुच्चार केला. महिला, दलित आणि गरिबातल्या गरीब व्यक्तींपर्यंत विकासाची गंगा पोहचवण्याचा प्रयत्न झाला पाहिजे हा गांधींचा विचार, आजच्या काळातही असहकार, सत्याग्रह या शस्त्रांचा शांतता प्राप्त करण्यासाठी उपयोग होऊ शकतो, आजच्या पिढीत राष्ट्रीय जाणीव विकसित करण्याची गरज अशा विचारांचा ऊहापोह परिषदेत करण्यात आला.
माहिती तंत्रज्ञान विभाग जयपूर येथील डॉ. नरेंद्रकुमार यांनी दृक्श्राव्य माध्यमातून प्रकट होणाऱ्या महात्मा गांधीजींच्या विचारांचा शोध घेतला.
या परिषदेत देशातील महाविद्यालयामधून आलेल्या पन्नासहून अधिक प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले. उत्तर प्रदेश, हरियाणा, ओरिसा, राजस्थान, गुजरात येथील प्रतिनिधींनी सहभाग नोंदवला होता. या परिषदेचा समारोप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.पी.महाजन यांच्या हस्ते झाला. महात्मा गांधींचे तत्त्वज्ञान हे सर्वकालीन सत्य असल्याचे सांगून त्यांच्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्राचा आधार घेत असत. अहिंसा, मूल्याधिष्ठित शिक्षण, चारित्र्यघडण, राष्ट्रनिर्माण या विचारांचा परामर्श डॉ. महाजन यांनी आपल्या भाषणात केला.

वझे केळकर महाविद्यालयाला ‘स्टार’ महाविद्यालय सन्मान
जतिन तावडे, युवा वार्ताहर
वझे केळकर महाविद्यालयास भारत सरकारच्या जीवतंत्रज्ञान विभागाद्वारे उत्कृष्ट वैज्ञानिक गुणवत्तेसाठी देण्यात येणाऱ्या ‘स्टार कॉलेज’ योजनेच्या अंतर्गत स्टार महाविद्यालय हा सन्मान मिळाला आहे. जीवतंत्रज्ञान विभागाद्वारे ‘स्टार’ नामांकनाच्या मार्फत विशेष अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे.
महाविद्यालयाचे मूल्यांकन करणाऱ्या ‘राष्ट्रीय मानांकन व प्रत्यांकन परिषद’ या संस्थेद्वारे सातत्याने तीन वेळा सर्वोच्च शैक्षणिक गुणवत्तेसाठी ‘अ’ दर्जा प्राप्त करणारे वझे महाविद्यालय हे महाराष्ट्रातील प्रथम महाविद्यालय ठरले आहे. महाविद्यालयीन स्तरावर संशोधनविषयक अत्याधुनिक सुविधांचा विकास करण्यासाठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाद्वारे देण्यात येणाऱ्या एफआयएसटी अनुदानाने वझे महाविद्यालयाला गौरवण्यात आले आहे. तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाद्वारे देण्यात येणाऱ्या ‘श्रेष्ठत्व सक्षम महाविद्यालय’ हा बहुमान वझे महाविद्यालयाला प्राप्त झाला आहे. मुंबई विद्यपीठातर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्काराने वझे महाविद्यालयाला गौरविण्यात आल आहे. उद्योग आणि शिक्षणाची सांगड घालत केळकर शिक्षण संस्थेद्वारे उद्योग क्षेत्रासाठी उपयुक्त संशोधन करणाऱ्या वैज्ञानिक संशोधन केंद्राची स्थापना केळकर महाविद्यालयातर्फे करण्यात आली. जीवतंत्रज्ञान तसेच सुगंधी द्रव्य निर्मिती क्षेत्रात संशोधन करणारे हे देशातील पहिले केंद्र आहे.

‘एनकेटी’मध्ये लघुपटांतून प्रबोधन
ठाणे : एनकेटी महाविद्यालयात शिवजयंतीचे निमित्त साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी, किल्ले यावर आधारित विद्यार्थ्यांना लघुपट दाखविण्यात आला. शिवकार्याची महती सांगणाऱ्या पोवाडय़ाच्या माध्यमातून शिवकार्याच्या महानतेचा परिचय होण्यासाठी पोवाडा गायनाचे प्रात्यक्षिक व प्रशिक्षण विद्यार्थ्यांना या निमित्ताने देण्यात आले. शिवकालीन इतिहासाचे आकलन होण्यासाठी शिवाजी महाराजांच्या उल्लेखनीय कार्यावर एक प्रश्नमंजूषा कार्यक्रमात आयोजित करण्यात आली होती. शिवकालीन मावळे ज्या पद्धतीने डोक्यावर फेटे बांधायचे त्याचे प्रशिक्षणही यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आले. समारंभाचे आयोजन आर्ट सर्कलच्या प्रमुख प्रा.आरती सामंत यांच्या संकल्पनेतून तसेच प्राचार्य डॉ. कारखेले यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आले होते.

‘स्टार्ट अप इंडिया’वर भाष्य
ठाणे : पी. डी. कारखानीस महाविद्यालयाच्या कॉमर्स असोसिएशनतर्फे ‘उत्स्फूर्त’ वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना विषयांची पूर्व कल्पना न देता विषय मिळाल्यावर काही मिनिटांचा अवधी विचार करण्यासाठी दिला. माझा महाविद्यालयातील पहिला दिवस, तरुणांची वाचन संस्कृती, मेक इन इंडिया स्टार्ट अप इंडिया, स्त्रियांची सुरक्षितता-जबाबदारी कोणाची? माझे आई माझे बाबा-ज्यांच्याविना नाही माझा आयुष्याला शोभा, व्यसनाधीनता व आजचा तरुण, आधुनिकीकरण आणि समाज, पाणी वाचवा जीवन वाचवा, लग्न आणि लिव इन रिलेशनशीप, आजचा विद्यार्थी आणि उद्याचा जबाबदार नागरिक, स्वछ भारत अभियान, भ्रष्टाचारमुक्त भारत-सत्य की स्वप्न, न्यूज चॅनल-रियालिटी ऑर एंटरटेन्मेंट? अशा विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त मते मांडली. स्टार्ट अप इंडिया स्कीलमुळे नवीन उद्योजकांना प्रेरणा मिळेल, लिव इनसाठी भारतात विरोधच आणि लग्न प्रथा ही समाज पद्धतीचे अनुकरण करणारी आहे, अशा प्रकारची चर्चा विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळाली. या स्पर्धेमध्ये कला आणि वाणिज्य शाखेच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना सुवर्णपदक
डोंबिवली : जनरल एज्युकेशन इन्स्टिटय़ूटच्या महिला महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने सलग तिसऱ्या वर्षी विद्यापीठाचे सुवर्णपदक प्राप्त करण्याची कामगिरी केली आहे. इतिहास विषयात मोहिनी वाघमारे (एम.ए.) व प्रविणा नटे (बी.ए.) या विद्याíथनींनी सर्वोच्च गुण प्राप्त केले आहेत. विद्यापीठाच्या २०१५ च्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी हे गुण प्राप्त केले असून त्यांचा पदवीदान समारंभ नुकताच पार पडला. चर्चगेट येथे विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाच्या कुलगुरू वसुधा कामत यांच्या हस्ते सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले. महाविद्यालयाच्या इतिहास विभागाने विद्यापीठाचे सुवर्णपदक मिळविण्याचे हे सलग तिसरे वर्ष आहे.