ठाणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या कामात व्यस्त असलेल्या ठाणे महापालिकेने जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून मालमत्ता कर वसुलीवर लक्ष दिले असतानाच, आता गेल्या दोन महिन्यांत शहरातील १५०० नवीन मालमत्ता शोधून त्यांना मालमत्ता कर आकारणीचे काम सुरू केले आहे.

या प्रक्रियेमुळे महापालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपयांचा महसूल जमा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच शहरातील मालमत्ताधारकांकडे असलेली १६० कोटी रुपयांची थकबाकी वसूल करण्यासाठी पालिकेने पावले उचलून त्यापैकी ४४ लाख ७५ कोटींची वसुली केली आहे.

जुलै महिन्याच्या मध्यावधीपासून पालिका प्रशासनाने मालमत्ता कर वसुली करण्यावर भर दिला असून यामुळे नोव्हेंबर महिनाअखेपर्यंत महापालिकेच्या तिजोरीत ३२२ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात एकूण पाच लाख दोन हजार करदाते आहेत. त्यापैकी दोन लाख २२ हजार करदात्यांनी कर भरला आहे.

कोटय़वधींचा महसूल मिळण्याची अपेक्षा

महापालिका प्रशासनाने गेल्या दोन महिन्यांत शहरातील १५०० नवीन मालमत्ता शोधून त्यांना मालमत्ता कर आकारणीचे काम सुरू केले आहे. त्यामध्ये वाढीव बांधकामे, बांधकामात बदल करणे आणि नवीन बांधकामे यांचा समावेश आहे. या बांधकामांना कराची आकारणी करण्यात आली नव्हती. या बांधकामांना कर आकारणी करण्यात आल्यामुळे महापालिकेच्या तिजोरीत कोटय़वधी रुपयांचा महसूल जमा होणार आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी दिली.