नावापुढे इंग्रजी आद्याक्षरे जोडून वैद्यकीय धंदा; गुन्हे दाखल करण्याचे आयुक्तांचे आदेश

वसई-विरार शहरांतील नागरिकांच्या जिवाशी खेळ करत ५१ बनावट डॉक्टरांनी वैद्यक धंदा मांडल्याचे समोर येत आहे. शहरातील बनावट डॉक्टर आणि नियमबाह्य़ रुग्णालये यांच्याविरोधात पालिका प्रशासनाने राबवलेल्या विशेष मोहिमेत ५१ डॉक्टर बोगस असल्याचे आढळले आहे. दवाखान्याच्या फलकावरील आपल्या नावापुढे ‘डीयूएमएस’, ‘एव्हीव्हीएएम’, ‘एएचएमआर’, ‘एलसीईएम’ अशी कोणत्याही इंग्रजी आद्याक्षरांची जंत्री जोडून रुग्णांची फसवणूक करण्याचा व्यवसाय हे डॉक्टर चालवत आहेत. त्यामुळे या सर्वावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिले आहेत.

महापालिकेने विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील सर्व डॉक्टरांना आपापल्या पदव्या सादर करून पालिकेकडे नोंदणी करण्यास सांगितले होते. या विशेष मोहिमेत रुग्णालय, पॅथॉलॉजी लॅब, खासगी क्लिनिक आणि डॉक्टरांच्या कागदपत्रे आणि पदव्यांची पडताळणी करण्यात आली. त्यात शहरात ५१ बोगस डॉक्टर आढळून आले. त्यांच्याकडे कुठल्याही नामांकित विद्यापीठाचीे पदवी नव्हती. महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलकडेही त्यांची नोंद नव्हती. त्यांनी सादर केलेल्या या सर्व पदव्या बोगस असल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाच्या प्रमुख डॉ. अनुपमा राणे यांनी सांगितले. या सर्व डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी दिले आहेत.

या बोगस डॉक्टरांनी आपापले दुकान टाकून त्यावर विविध पदव्या लटकविलेल्या आहेत. डीयूएमएस, एव्हीव्हीएएम, एएचएमआर, एलसीईएम, बीआयएमएस अशी वाटेल ती आद्याक्षरे जोडून पदव्या तयार केलेल्या आहेत. अशा प्रकारचा कुठला अभ्यासक्रम आणि पदव्या नसून केवळ गरीब जनतेची फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे. या बोगस डॉक्टरांकडे जाऊन उपचार केल्यास जीविताला धोका उत्पन्न होऊ शकतो, असे डॉ. राणे यांनी सांगितले.

सर्वाधिक बोगस डॉक्टर्स नालासोपाऱ्यात आढळून आले आहेत. येथील धानिव बाग परिसरात तर तब्बल १९ बोगस डॉक्टर आहेत. ‘आम्ही सर्व बोगस डॉक्टरांविरोधात फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांचे दवाखाने सील करणार आहोत. मात्र नागरिकांनीही अशा डॉक्टरांपासून सावध राहावे व शक्यतो पालिकेच्या वैद्यकीय सुविधांचा लाभ घ्यावा,’ असे आवाहन पालिका आयुक्त सतीश लोखंडे यांनी केले आहे.