८ मे रोजी भूमिपुत्र राजभवनावर धडकणार; पाणी वाचवण्यासाठी १९ मार्चपासून बेमुदत उपोषण

पालघर जिल्ह्य़ातील विविध प्रकल्पांच्या नावाखाली बेकायदा सुरू असलेल्या भूसंपादनाच्या विरोधात येथील भूमिपुत्रांचा मोर्चा  ८ मे रोजी राजभवनावर धडकणार आहे. ३०हून अधिक विविध संघटना यात सहभागी होणार आहेत. याशिवाय पालघरचे पाणी वाचवण्यासाठी १९ मार्चपासून पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू केले जाणार आहे. ‘भूमी अधिकार आंदोलना’च्या वतीने गुरुवारी पालघरमध्ये झालेल्या जाहीर सभेत शासनाविरोधात निर्णायक लढा उभारण्याता निर्धार करण्यात आला आहे.

पालघर जिल्ह्य़ात शासनाचे विविध प्रकल्प सुरू आहेत. या प्रकल्पासाठी हजारो शेतकरी, भूमिपुत्रांच्या जागा जाणार आहेत. या प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यासाठी प्रकल्पासाठी जमिनी ताब्यात घेण्यापूर्वी ग्रामसभांची मान्यता घेण्याची तरतूद काढून घेतली आहे. त्यामुळे येथील स्थानिक भूमिपुत्र विस्थापित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याशिवाय सूर्या प्रकल्पाचे पाणी वसई-विरार आणि मीरा-भाईंदरला वळवण्यात आले आहे. पालघर जिल्हा तहानलेला राहत असताना जिल्ह्य़ातले पाणी बाहेर जात असल्याने नागरिकांच्या संतापात भर पडली आहे. यासाठी तीसहून अधिक संघटना एकत्र आल्या असून त्यांनी भूमी अधिकार आंदोलनाची स्थापना केली आहे. या आंदोलनाचा पहिला एल्गार गुरुवारी पालघरमध्ये उमटला. रणरणत्या उन्हात हजारो भूमिपुत्र या सभेला उपस्थित होते. बोईसर येथील दांडेकर मैदान येथून रॅली काढण्यात आली. या रॅलीचे जाहीर सभेत रूपांतर झाले. भूसंपादनासाठी ग्रामसभेची परवानगी रद्द करण्याच्या राज्यपालांच्या अधिसूचनेचा निषेध करण्यात आला. त्याला विरोध करण्यासाठी ८ मे रोजी राजभवनावर धडक देण्याचे या वेळी जाहीर करण्यात आले, तर जिल्ह्य़ातील पाणी इतरत्र पळवून नेऊ  नये याविरोधात आंदोलनांतर्गत १९ मार्चपासून जिल्हाधिकारी कार्यालयावर बेमुदत उपोषण सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

राज्यात येऊ  घातलेले अनेक विनाशकारी प्रकल्प आपल्याला उद्ध्वस्त करून टाकणारे असून यापासून आपला बचाव करायचा असेल तर आपल्या मागण्या मागण्यासाठी हे आंदोलन रास्त आहे.

विलास भोंगळे, आंदोलनकर्ते

हे आंदोलन भूमिपुत्र, शेतकरी, आदिवासी यांच्या मागण्यांसाठीची एक चळवळ आहे. या आंदोलनांतर्गत एकत्र येत आपल्या विविध मागण्या आपण सरकारदरबारी मांडून त्या मंजूर करून घेणार आहोत.

रमाकांत पाटील, आंदोलनकर्ते