प्रसेजनीत इंगळे

वावटेवाडी, फुलपाडा, विरार पूर्व

विरार पूर्वेच्या वावटेवाडी परिसरातील २० इमारतींमधील सुमारे ९०० कुटुंब विविध समस्यांसाठी लढत आहेत. विकासकांनी आरक्षित जागेवर इमारती बांधून या रहिवाशांची फसवणूक केली आहे. त्यामुळे पालिकेच्या कारवाईची टांगती तलवार त्यांच्या डोक्यावर आहे. गेल्या चार वर्षांपासून ते न्यायालयात यासाठी झगडत आहेत. याशिवाय अनेक मूलभूत समस्यांचा सामना येथील रहिवाशांना करावा लागत आहे.

२००८-२००९ च्या काळात विरार पूर्वेच्या फुलपाडा येथील वावटेवाडी परिसरात इमारती बांधायला सुरुवात झाली. परिसरात २० इमारती आहेत. या २० इमारतींमध्ये मुंबईतून स्थलांतरित झालेली ८८० कुटुंबे राहतात. या परिसरातील काही जागांवर पालिकेचे आरक्षण होते. मात्र तरी विकासकांनी खोटी कागदपत्रे बनवून लोकांना घरे विकली. स्वस्त आणि इमारतीत राहायला मिळणार या उद्देशाने अनेकांनी आपल्या जीवनाची पुंजी लावून, कर्ज घेऊन, दागदागिने विकून हक्काचे घर घेतले. पण त्यांना त्या वेळी पुसटशीही कल्पना नव्हती की आपण जी घरे घेत आहोत, उद्या याच घराच्या अस्तित्वासाठी आपल्याला लढाई लढावी लागणार आहे. भाकरीच्या लढाईसाठी मुंबई गाठायची आणि रोज ट्रेनचे धक्के खात घर गाठायचे असे असले तरीही या परिसरातील कुटुंबे गुण्यागोविंदाने राहत होती.

मात्र २०१६मध्ये महापालिका विकास आराखडय़ानुसार या परिसरातील इमारतींवर संक्रात ओढवली. या परिसरातून महापालिकेचा मुख्य रस्ता जात असल्याने त्यात काही इमारती बाधित होत असल्याने इमारती रिकाम्या करण्याची नोटीस महापालिकेकडून बजावण्यात आल्या आणि ८८० कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. ज्या विकासकांनी त्यांना घरे दिली होती, त्यांनी आपली दुकाने बंद करून पळ काढला होता, तर स्थानिक लोकप्रतिनिधींनीही हात वर केले. यामुळे आता करायचे काय? हा मोठा प्रश्न या रहिवाशांपुढे उभा ठाकला. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने पुन्हा घर घेऊ  शकत नाही. सर्व संसार रस्त्यावर येईल. यामुळे रहिवाशांची रात्रीची झोप उडाली. पण त्यातून मार्ग काढण्याचा निर्धार करत रहिवाश्यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. तब्बल चार वर्षे लढा देत रहिवाशांनी अर्धी लढाई जिंकली. सध्या अजूनही प्रकरण न्यायालयात असले तरी न्यायालयाने विकासक, जमीनदार आणि बिल्डर यांना रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे सांगितले आहे. पण विकासकांनी आधीच पळ काढल्याने आणि जमीनदाराने आर्थिक कारण पुढे केल्याने रहिवाशांची लढाई लांबली आहे. पण महापालिकेचे नोटीस सत्र मात्र अजूनही सुरूच आहे. प्रकरण न्यायालयात असल्याने आता या सोसायटीकडे प्रशासनाने लक्ष देणे बंद केले आहे. मात्र इमारतींमधील रहिवाशांच्या डोक्यावर सतत कारवाईची टांगती तलवार आहे. विकासकांनी आम्हाला फसवले यात आमचा काय दोष, असा सवाल येथील रहिवासी करत आहेत.

सध्या अनेक नागरी समस्याने हा परिसर ग्रासला आहे, या परिसरात असलेले विजेचे रोहित्र वाकले असून कधीही पडून मोठी जीवितहानी होऊ  शकते. या संदर्भात महावितरणाला अनेक वेळा पत्रव्यवहार केला. मात्र अद्यापही कारवाई झाली नाही. महापालिकेचे मुख्य गटार या परिसरातील मुख्य रस्त्यावरच आहे. हे गटार सतत तुडुंब भरून वाहत असते. त्याचे पाणी रस्त्यावर येऊन सर्वत्र दुर्गंधी आणि घाणीचे साम्राज्य पसरत आहे. त्याचा रहिवाशांना त्रास होत असतो. परिसरात भटक्या श्वानांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. लहान मुले, वृद्ध, बाजारहाट करून येणाऱ्या महिला यांना भटक्या श्वानांचा त्रास होत आहेत. तसेच परिसरात अनेक ठिकाणी मोकळ्या जागा असल्याने अंधाराचा फायदा घेत मद्यपी ठाण मांडून बसलेले असतात. या संदर्भात विरार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पण कारवाई होत नसल्याचे येथील महिलांनी सांगितले.