माजी नगरसेवकाला धक्काबुक्की झाल्याने गदारोळ; काँग्रेसचा नगरसेवक निलंबित
मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी भाजपच्याच माजी नगरसेवकाला सुरक्षारक्षकांनी केलेल्या धक्काबुक्कीवरून महासभेत शनिवारी प्रचंड गदारोळ झाला. त्यातच काँग्रेसच्या नगरसेवकाने सभागृहातील माईक आपटून तोडल्याने गदारोळात भर पडली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सभागृहात सुरक्षारक्षकांना पाचारण करण्यात आल्याने सभागृहाला आखाडय़ाचे स्वरूप प्राप्त झाले होते.
पालिकेच्या शनिवारी झालेल्या महासभेत भाजपचे माजी नगरसेवक ओमप्रकाश गाडोदिया प्रेक्षागृहात उपस्थित होते. प्रशासनाकडून सुरू असलेल्या काही गैरप्रकारांबाबत त्यांनी आयुक्तांकडे तक्रार केली होती. मात्र त्याची दखल घेतली जात नसल्याने प्रशासनाचा निषेध म्हणून त्यांनी सभा सुरू असताना प्रेक्षागृहातून फलक फडकावले. सुरक्षारक्षकांनी त्यांच्या हातून फलक काढून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी झालेल्या झटापटीत गाडोदिया यांना धक्काबुक्की झाली. याचे पडसाद सभागृहात उमटले. एका माजी नगरसेवकाला अशा पद्धतीने वागणूक देण्यात येत असल्याबद्दल काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी जोरदार आक्षेप घेतला. त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त झालेले काँग्रेस नगरसेवक प्रमोद सामंत यांनी टेबलावरचा माईक उचलून जोरात आपटला. माईकचा एक तुकडा भाजपच्या नगरसेविका सुमन कोठारी यांना डोळ्यांजवळ लागल्याने भाजपचे नगरसेवकही आक्रमक झाले. त्यांनी सामंत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी महापौरांकडे केली.
महापौर गीता जैन यांनी सामंत यांना निलंबित करून सभागृह सोडण्याचे आदेश दिला. मात्र सामंत सभागृहातच बसून राहिल्याने महापौरांनी सभागृहात सुरक्षारक्षकांना पाचारण केले. सुरक्षारक्षकांनी सामंत यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करताच वातावरण आणखी तापले.
एक तास वाया
आयुक्तांनीही ओमप्रकाश गाडोदिया यांना त्यांच्या तक्रारीत वैयक्तिक लक्ष घालण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सभागृहातील वातावरण शांत होऊन कामकाज पुढे सुरू झाले, परंतु या सर्व गदारोळात सभागृहाचा सुमारे एक तास वाया गेला.