पोलिसांच्या हजेरीनंतर गुंडांचा काढता पाय; पालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या उच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू असताना दोन उमेदवारांमध्ये बाचाबाची होऊन प्रकरण हाणामारीपर्यंत गेल्याने शिवसेनेतील पक्षांतर्गत स्पर्धा समोर आली आहे. या प्रकारानंतर दोन्ही गटांच्या उमेदवारांनी गुंडांना हजर केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवसेनेकडून इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्याचा कार्यक्रम बाजारपेठमधील एका सभागृहात गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यासाठी मुंबई, ठाण्यातील शिवसेनेचे नेते कल्याणमध्ये आले होते. सकाळी मुलाखतींचा कार्यक्रम सुरू झाला. मोहने येथील इच्छुक उमेदवार दया शेट्टी हे आपल्या समर्थकांसह हजर होते. त्यांना मोहने गावठाण येथून शिवसेनेतर्फे निवडणूक लढवायची आहे. याच प्रभागातून शिवसेनेचे उल्हास जामदार हेही इच्छुक आहेत. दोन्ही इच्छुक उमेदवार समोरासमोर आले असता शेट्टी यांनी आपण मोहने येथील स्थानिक रहिवासी आहोत. तुम्ही कल्याणमध्ये राहता, असे जामदार यांना सांगितले. यावर मोहने गावठाण येथून लढणार असल्याचा हेका जामदार यांनी कायम ठेवला. त्यामुळे जामदार, शेट्टी यांच्यातील वाद वाढत जाऊन त्याचे रूपांतर हाणामारीत झाले. अन्य पदाधिकाऱ्यांनी मध्यस्थी केल्याने वाद मिटल्याची चिन्हे असतानाच दोन्ही गटांनी आपले दादा घटनास्थळी पाचारण केले. यामुळे सभागृहामध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांना याची कुणकुण लागताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. यामुळे या दोन्ही गटांच्या दादा लोकांनी सभागृहातून काढता पाय घेणेच पसंत केले. जामदार यांच्याशी संपर्कहोऊ शकला नाही. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी घटनास्थळी किरकोळ बाचाबाची झाल्याचे सांगितले. निवडणुकीसाठी शिवसेनेतून १२२ प्रभांगासाठी सुमारे सहाशे जण इच्छुक आहेत.