खाडी किनाऱ्यावरील पक्ष्यांचा अधिवास धोक्यात

ठाणे-भिवंडी रस्त्यालगतच्या खारफुटींची तोड करून भूखंड बळकावणाऱ्या भूमाफियांनी आता आपला मोर्चा पाणथळींकडे वळवला आहे. कशेळी परिसरातील सुमारे दीड एकर परिसरात स्थानिक ग्रामपंचायतीच्या साहाय्याने भराव टाकण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून यामुळे येथे येणाऱ्या पक्ष्यांचा अधिवास नष्ट झाला आहे.

कशेळी खाडीकिनाऱ्यावर सुमारे दीड एकर पाणथळ भूमीवर मागील आठवडय़ात एका रात्रीत भराव टाकण्याचा प्रकार घडला. या प्रकरणाची माहिती मिळताच या परिसरात निसर्ग संवर्धनासाठी काम करणाऱ्या श्रीएकविरा आई प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन भराव रोखण्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयास याची माहिती देऊन याप्रकरणी पंचनामा करण्याची विनंती केली. या वेळी येथे आलेल्या ग्रामपंचायत सरपंचांनी हा भराव गटार बांधण्यासाठी टाकण्यात आला आहे, असे स्पष्टीकरण दिले. काम पूर्ण झाल्यानंतर हा भराव हटवण्याचे आश्वासन दिले. मात्र हा भराव टाकणेच बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट करत संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी याविषयी जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादात सुरू असलेल्या प्रकरणांमध्ये या भरावाची माहिती समाविष्ट करण्याची विनंती करण्यात आली आहे.

लाखो स्थानिक आणि स्थलांतरित पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या ठाणे खाडी परिसराला राज्य सरकारने २०१५ मध्ये ‘फ्लेमिंगो अभयारण्य’ जाहीर केले आहे. यामुळे या परिसरातील पाणथळ भूमी संरक्षित झाली असून त्यावर कोणत्याही प्रकारचे अतिक्रमण होणे पक्ष्यांच्या अधिवासाला धोका निर्माण करण्यासारखे आहेत. ठाणे खाडी परिसरात सुमारे दोन लाखांहून अधिक पक्ष्यांचे अस्तित्व असून पाणथळ जागांवर टाकण्यात आलेल्या भरावामुळे त्यांचे प्रमाण घटू लागले आहे. या परिसराला अभयारण्याचा दर्जा मिळाला असला तरी परिसरातील अतिक्रमणे जैसे थे असून दिवसेंदिवस वाढतच आहेत. यासाठी ‘वनशक्ती’ सामाजिक संस्था न्यायालयीन लढा लढत असली तरी कशेळी, काल्हेर भागांतील अतिक्रमणे सुरूच आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार पवार यांनी दिली.

कशेळी, काल्हेर परिसरांतील खारफुटींच्या अतिक्रमणाच्या यापूर्वी अनेक तक्रारी आल्या असून त्यांच्यावर प्रशासनाकडून कारवाई करण्यात आल्या आहेत. अनेक भागांमध्ये संरक्षणद्वार उभारण्यात आले असून अतिक्रमण रोखण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाणथळ भूमीवर अतिक्रमण होत असल्यास त्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल. मंडल अधिकाऱ्यांना याविषयी सूचना करण्यात आल्या आहेत.

– वैशाली लंभाते, भिवंडी तहसीलदार