२३ चित्रपट आणि १६ लघुपटांचा समावेश
येथील ‘अंबर भरारी’ या संस्थेच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ठाणे जिल्ह्य़ातील पहिल्याच मराठी चित्रपट महोत्सवास अपेक्षेहून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या एकदोन वर्षांत प्रदर्शित झालेले तसेच लवकरच प्रदर्शित होणारे २३ चित्रपट आणि १६ लघुपट या महोत्सवात सहभागी झाले आहेत. त्यात डॉ. प्रकाश बाबा आमटे, रेगे, रमामाधव, सोपानाची आई बहिणाबाई, सिंड्रेला, विटी-दांडू, रेनी डे आदी चित्रपट तर अस्तित्व, पेस्ट्री, गल्ला, टी-टाईमसारख्या लघुपटांचा समावेश आहे. यानिमित्ताने आतापर्यंत दक्षिण आणि मध्य मुंबईपुरत्या मर्यादित असणाऱ्या चित्रपट महोत्सव संस्कृतीने सीमोल्लंघन करून दूरवरच्या उपनगरात प्रवेश केला आहे. २९ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर या कालावधीत अंबरनाथ येथील बिग सिनेमा या मल्टिप्लेक्समध्ये आयोजित महोत्सवात २३ पैकी परीक्षकांनी निवडलेले नऊ चित्रपट दाखविण्यात येतील. या महोत्सवात चित्रपटासाठी २८ आणि लघुपटासाठी दहा अशी एकूण ३८ पारितोषिके दिली जाणार आहेत. महोत्सव काळात सकाळी ११ वाजल्यापासून चित्रपट दाखविले जाणार आहेत. रसिकांना विनामूल्य प्रवेश आहे. मात्र जागा मर्यादित असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य या तत्त्वाने सिनेमागृहात प्रवेश दिला जाईल, अशी माहिती महोत्सवाचे संयोजक माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी दिली.
लेखक दिग्दर्शक महेंद्र पाटील, अभिनेते महेश सुभेदार आणि नाटय़कर्मी जगदीश हडप महोत्सवाचे दिग्दर्शक आहेत. याशिवाय अंबरनाथ जयहिंद बँकेच्या रूपा देसाई-जगताप, डॉ. राहुल चौधरी, डॉ. सपना चौधरी, डॉ. आरती धानिपकर, संगीता गुप्ते, रोटरी सदस्य आदी शहरातील विविध मान्यवरांनी जिल्ह्य़ातील हा पहिलाच चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी हातभार लावला आहे.

आज नामांकने
२७ ऑक्टोबर रोजी मुंबईत महोत्सवातील चित्रपटांची नामांकने जाहीर केली जाणार आहेत. या वेळी महोत्सवात सहभागी झालेल्या चित्रपटांमधील काही कलावंत उपस्थित राहतील, अशी माहिती संयोजकांनी दिली.