उत्तर प्रदेशमधील रेल्वे स्थानकात चुकीच्या रेल्वेगाडीत बसल्याने ठाणे स्थानकात पोहोचलेल्या दोन अल्पवयीन मुलींचे पालक अखेर सापडले. ठाणे न्यायालयाच्या निर्देशाने पोलिसांनी महिनाभरात तपास करून दोघींची कुटुंबीयांसोबत भेट घडवून आणली. मोठी मुलगी १७ वर्षांची तर दुसरी ४ वर्षांची आहे. मोठी मुलगी मानसिक रुग्ण असल्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना शोधण्याचे मोठे आव्हान असतानाही पोलिसांनी कौशल्य पणाला लावत हा तपास केला.

ठाणे रेल्वे स्थानकात दोन अल्पवयीन मुली महिनाभरापूर्वी कोपरी पोलिसांना सापडल्या होत्या. मोठी १७ वर्षांची मुलगी मानसिक रुग्ण असल्याची बाब पोलिसांच्या निदर्शनास आली होती. तसेच तिच्यासोबत असलेल्या चार वर्षांच्या मुलीला कुटुंबीय आणि गावाबद्दल काहीच सांगता येत नव्हते. त्यामुळे या दोन्ही मुलींना पोलिसांनी ठाण्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी राजेंद्र तांबे यांच्यासमोर हजर केले.

त्या वेळेस न्यायदंडाधिकारी तांबे यांनी मोठय़ा मुलीला उपचारासाठी ठाणे मनोरुग्णालयात दाखल करण्यास तर तिच्या बहिणीला सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून डोंबिवलीच्या जननी आशीष संस्थेत ठेवण्यास सांगितले. तसेच ठाणेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र मालेकर आणि ठाणे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र दौंडकर यांना दोघींच्या पालकांचा शोध घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते, अशी माहिती पोलीस उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

ठाणे मनोरुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय बोधडे यांनी मोठय़ा मुलीवर उपचार सुरू केले. या उपचारांमुळे ती मुलगी थोडी फार बोलू लागली. मात्र ती भोजपुरी भाषेत बोलत असल्यामुळे तिची भाषा पोलिसांना समजत नव्हती. त्यामुळे भोजपुरी भाषेचे ज्ञान अवगत असलेल्या महिलेची मदत घेऊन पोलिसांनी तिच्या गावची माहिती घेतली. तिने बिहार राज्यातील दिलदारनगरची रहिवासी असल्याचे सांगितले होते.

परंतु बिहार राज्यात दिलदारनगर नसल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले. त्यामुळे पोलिसांनी उत्तर प्रदेशमध्ये दिलदारनगर आहे का, याची माहिती गुगलद्वारे घेतली. त्यानंतर पोलिसांनी तेथील स्थानिक पोलिसांशी संपर्क साधून त्यांना सापडलेल्या मुलींचे फोटो पाठविले. या फोटोमधील दोन्ही मुली बेपत्ता असल्याची माहिती स्थानिक पोलिसांकडून मिळाली आणि त्यानंतर त्यांच्या मदतीने पोलिसांनी दोघींच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. दोन्ही मुलींना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिले आहे, असेही उपायुक्त देवराज यांनी सांगितले.

वाट अशी चुकली..

या दोन्ही मुली उत्तर प्रदेशातील दिलदारनगरच्या रहिवासी आहेत. त्या त्यांच्या आत्याच्या गावी म्हणजेच चांदोरी जिल्ह्य़ात गेल्या होत्या. तेथून त्या रेल्वेने घरी परतण्यासाठी निघाल्या होत्या. त्या वेळेस त्या चुकीच्या रेल्वेत बसल्या आणि ठाणे रेल्वे स्थानकात येऊन पोहोचल्या, असे पोलिसांनी सांगितले.