अंबरनाथ पालिकेचे तीन वर्षांपासून दुर्लक्ष

अंबरनाथमधील रस्तारुंदीकरणावेळी तीन वर्षांपासून रखडलेल्या गटाराच्या दरुगधीबद्दल वारंवार पालिकेला स्थानिक नागरिकांनी पत्रव्यवहार करूनही दुर्लक्ष झाल्याने त्रस्त नागरिकांनी स्वखर्चाने गटार बांधून पालिकेचे डोळे उघडण्याचे काम केले आहे.
केंद्र व राज्यातील स्वच्छ अभियानामुळे शहरांमध्ये स्वच्छतेला महत्त्व आले असून पालिकांमध्ये मोठय़ा प्रमाणावर स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. मात्र याउलट परिस्थिती अंबरनाथमध्ये एका घटनेवरून पाहायला मिळत असून एक रखडलेले गटार पालिकेऐवजी स्थानिकांनी स्वखर्चाने बांधून आपले समाजाप्रति असलेले औदार्य दाखविले आहे. अंबरनाथ पूर्वेकडील शिवाजी चौक ते स्वामी समर्थ चौक या मार्गावर स्थानक परिसरातील रस्ता गेल्या तीन वर्षांपासून अपूर्ण अवस्थेत आहे. त्याच रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्यालगतची काही गटारे तुटली होती. त्यामुळे या तुटलेल्या गटारातील दरुगधीमुळे स्थानिक नागरिक हैराण झाले होते. याबाबत पालिकेशी वारंवार पत्रव्यवहार केल्याचे स्थानिक नागरिकांनी या वेळी स्पष्ट केले आहे.
अखेर या परिसरातील व्यापारी व नागरिकांनीच संबंधित गटारासाठी १९ हजार रुपये काढत या तुटलेल्या गटाराचे काम पूर्ण करून घेतले आहे. त्यामुळे आता या परिसरातील दरुगधी कमी झाली असून गटार व्यवस्थित झाले आहे. त्यामुळे आता पालिकेऐवजी नागरिकांनीच औदार्य दाखवत आपली सामाजिक जबाबदारी पार पडल्याची चर्चा होत असून पालिकेकडून दुर्लक्ष झाल्याबद्दल अनेकांनी याबाबत नाराजीचा सूर लावला आहे.