‘लोकसत्ता ठाणे’च्या वृत्तानंतर जिल्हा रुग्णालय प्रशासनाला जाग; रुग्णालय परिसरात कायमस्वरूपी स्वच्छतेची मागणी
ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या परिसरातील कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे सचित्र वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर जाग्या झालेल्या रुग्णालय प्रशासनाने येथील कचरा हटवला. गेल्या अनेक दिवसांपासून परिसरामध्ये हा कचरा जसाच्या तसा पडून होता. तो हटवण्याची तसदी प्रशासनाकडून घेतली जात नव्हती. जिल्ह्य़ातून रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. विशेष म्हणजे या कचऱ्यात चक्क दारूच्या बाटल्याही आढळल्याने रुग्णालय परिसरातील अवैध प्रकारही चव्हाटय़ावर आला होता. त्यावर पांघरूण घालण्यासाठी प्रशासनाने अखेर हा कचरा हटवला आहे. मात्र कचऱ्याचे ढीग हटले असले, तरी या परिसरातील अस्वच्छता मात्र कायम आहे. नियमित झाडलोट होत नसल्याने रुग्णालयाच्या परिसरामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे.
ठाणे जिल्ह्य़ातील सर्व शहरांमधील नागरिकांच्या आरोग्याची भिस्त असलेल्या ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील कारभारावर प्रशासकीय वचक नसल्याने परिसराची पुरती दुर्दशा उडाली आहे. ठाणे शहरातील वेगवेगळ्या भागांतून तसेच कल्याण-डोंबिवली, भिवंडी आणि उल्हासनगर यांसारख्या भागांतून उपचारासाठी रुग्णालयात येणाऱ्यांना येथील अस्वच्छतेचा सामना करावा लागतो. या भागातील दुरवस्था लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने या परिसराचे सुशोभीकरणही केले होते. त्यासाठी सुमारे ४० लाखांचा निधी खर्च करण्यात आला. असे असले तरी रुग्णालय प्रशासनाकडून या भागाची स्वच्छता केली जात नसल्याने रुग्णालय परिसराला ओंगळवाणे रूप प्राप्त झाले आहे. रुग्णालयाच्या परिसरात मोठय़ा प्रमाणात बांधकाम साहित्य टाकण्यात आले होते. त्यामध्ये वैद्यकीय कचरा, दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकच्या साहित्यांचा खच होता. या साहित्यामुळे परिसरात घाण पसरली होती. ‘लोकसत्ता ठाणे’च्या शनिवारच्या अंकामध्ये या परिसरातील दुर्दशेचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यानंतर जाग्या झालेल्या प्रशासनाने तात्काळ या भागातील बांधकाम साहित्याचा कचरा उचलून परिसर साफ करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी अजूनही पुरेशी स्वच्छता होत नसल्याने हा परिसर अस्वच्छ असल्याचे दिसून येत आहे.

‘अस्वच्छता दूर करा’
रेल्वे रूळांवर अपघात झाल्यानंतर अशा रुग्णांना तात्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले जाते. आपत्कालीन परिस्थितीमध्ये उपचारासाठी महत्वपूर्ण ठरणारे हे रुग्णालया अस्वच्छतेमुळे त्रासदायक ठरत आहे. येथे येणारे रुग्णांचे नातेवाईक, पोलीस कर्मचारी आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनाही त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही अस्वच्छता तात्काळ दूर करण्याची मागणी येथील सगळ्यांकडून केली जात आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांची गैरसोय

जिल्हा शासकीय रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांमध्ये प्रामुख्याने अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिक असतात. उपचारासाठी सोईचे ठरणारे हे रुग्णालय रुग्णांसोबतच्या नातेवाईकांसाठी मात्र गैरसोईचे ठरत आहे. रुग्णांसोबत येणाऱ्या नातेवाईकांना या भागातील गलिच्छपणाचा सामना करावा लागतो.या भागात नियमित झाडलोट व्हावी, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.