अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा

ठाणे : करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने लागू केल्या जाणाऱ्या टाळेबंदीमुळे ठाण्यातील व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले असतानाच या व्यापाऱ्यांवर अवलबूंन असलेल्या कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. पहिल्या टप्प्यातील टाळेबंदीत बहुतांश व्यापाऱ्यांनी दुकानातील २५ ते ३० टक्के कर्मचारी कामावरून कमी केले आहेत. नव्याने लागू झालेल्या टाळेबंदीचा फटका आणखी कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. सध्या कामावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांना व्यापारी घरबसल्या अर्धा पगार देत असून त्यात घरखर्च कसा भागवायचा, असा प्रश्न कर्मचाऱ्यांपुढे उभा राहिला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुमारे ५० हजारांच्या आसपास विविध दुकाने असून त्या ठिकाणी सुमारे पाच लाख कर्मचारी काम करतात. करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी केल्यानंतर शहरातील सर्वच दुकाने बंद झाली होती. तीन महिन्यांपासून दुकाने बंद असली तरी व्यापारी कर्मचाऱ्यांना घरबसल्या अर्धा पगार देत होते. टाळेबंदीच्या काळात बंद दुकानांचे भाडे, वीज बिल आणि कर्मचाऱ्यांचा पगार देणे अनेक व्यापाऱ्यांना शक्य होत नव्हते. यामुळे अनेक व्यापाऱ्यांनी दीड ते दोन महिन्यांत २५ ते ३० टक्के कर्मचारी कामावरून काढून टाकले. जून महिन्यात केंद्र आणि राज्य शासनाने टाळेबंदी शिथिल केल्यानंतर दुकाने पुन्हा सुरू झाली. दुकानांची विस्कटलेली आर्थिक घडी बसण्यास सुरुवात झाली असतानाच पालिकेने पुन्हा टाळेबंदी लागू केली. यामुळे व्यापाऱ्यांसह त्यांच्यावर अवलंबून असणाऱ्या कर्मचाऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले आहे. नौपाडा व्यापारी असोशिएशनचे अध्यक्ष मितेश शहा यांनी या वृत्तास दुजोरा देत या कर्मचारी वर्गाकडे शासनाने दुर्लक्ष करू नये, असे सांगितले.

कुटुंबात मी एकटाच कमविणारा असून त्याचबरोबर वडिलांच्या डायलेसीसचा खर्च करायचा असतो. टाळेबंदीमुळे दुकान बंद असतानाही मालक आम्हाला अर्धा पगार देत आहेत. त्यात आम्हाला घरखर्च आणि दवाखान्याचा खर्च भागविणे शक्य होत नाही.

– धनंजय मदणे, नौपाडय़ातील दुकानात काम करणारा कर्मचारी

टाळेबंदीच्या काळात दुकान मालकांकडून अर्धा पगार मिळत असला तरी त्यात घरखर्च भागविणे शक्य होत नाही. घराचे भाडे, मुलांच्या शाळेचे शुल्क कसे भरायचे, असाही प्रश्न आहे. दुकान मालक अर्धा पगार देत आहेत. पण, दुकाने बंद असल्याने तेही आणखी किती दिवस पगार देणार?   

– विनोद सागळे, कपडे दुकानातील कर्मचारी