उच्चस्तरीय चौकशी अहवालातील निष्कर्ष

ठाणे : येथील वर्तकनगर भागातील वेदांत रुग्णालयातील चार करोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायुअभावी नव्हे तर, प्रकृती खालावल्यामुळेच झाल्याची बाब उच्चस्तरीय चौकशी समितीच्या अहवालातून पुढे आली आहे. तसेच या रुग्णांच्या उपचारांदरम्यान रुग्णालयाकडून कोणताही वैद्यकीय हलगर्जीपणा झालेला नाही, असे चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. ठाणे येथील वर्तकनगर भागातील वेदांत या खासगी करोना रुग्णालयात चार रुग्णांचा सोमवारी सकाळी मृत्यू झाला होता.

या मृत्यूंबाबत सखोल चौकशी करण्यासाठी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भिवंडी महापालिकेचे आयुक्त पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली सहा जणांची उच्चस्तरीय चौकशी समितीची स्थापना केली होती. त्यामध्ये ठाणे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. शिवाजी पाटील, ठाणे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार, ठाणे महापालिका उपायुक्त संदीप माळवी, ठाणे महापालिकेच्या तत्कालीन मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. वैयजंती देवगीकर आणि ठाणे महापालिका बायोमेडिकल अभियंता मंदार महाजन यांचा समावेश होता. या समितीने अहवाल नुकताच ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना सादर केला आहे. त्यामध्ये रुग्णांचा मृत्यू प्राणवायुअभावी नव्हे तर, प्रकृती खालावल्यामुळेच झाला असल्याचे म्हटले आहे.

रुग्णालयाला सूचना

या रुग्णांच्या उपचारांमध्येही कोणताही वैद्यकीय हलगर्जीपणा दिसून आलेला नाही, असे अहवालात समितीने स्पष्ट केले आहे. या रुग्णांच्या प्रकृतीविषयी रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी सुसंवाद ठेवला असता तर, ही गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली नसती. तशा सूचना संबंधित रुग्णालयाला देण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत.