News Flash

कल्याण कचराभूमीला भीषण आग

मिथेन वायू हेच आगीचे कारण असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

कल्याणमधील आधारवाडी कचराभूमीला लागलेल्या भीषण आगीनंतर पसरलेले धुराचे लोट.  छाया : दीपक जोशी 

कल्याणमधील आधारवाडी कचराभूमीला मंगळवारी संध्याकाळी पाच वाजता अचानक भीषण आग लागली. संध्याकाळच्या वेळेत वाऱ्याचा वेग तुफान असल्याने आगीने क्षणार्धात विक्राळ रूप धारण केले. आगीनंतर धुराचे लोट कचराभूमीलगतच्या निवासी वस्तीत घुसल्याने रहिवाशांना प्रचंड त्रास झाला. धूर तीन ते चार तास हवेत स्थिरावल्याने रहिवासी कासवीस झाले. कचराभूमीला गेल्या दोन महिन्यांत लागलेली ही पाचवी ते सहावी आग आहे. मार्चमध्ये बारावीची परीक्षा सुरू असताना आग लागून विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिका लिहिताना खूप त्रास सोसावा लागला होता.

पालिका हद्दीतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी पालिका प्रशासनाने कोणत्या उपाययोजना केल्या? आधारवाडी कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करण्यासाठी पालिकेने कोणती ठोस पावले उचलली याचे सादरीकरण येत्या पंधरा दिवसांत पालिका प्रशासनाला उच्च न्यायालयासमोर करायचे आहे, अशा परिस्थितीत ही भीषण आग लागल्याने कचरा निर्मूलनाच्या पालिकेच्या कुचकामी उपाययोजनांचा पर्दाफाश झाला आहे.

पारनाका, लालचौकी, शिवाजी चौक, मुरबाड रस्ता, आधारवाडी चौक, खडकपाडा, गंधारे, बारावेपर्यंत धुराचे लोट पसरले होते. कचराभूमीलगतच्या साठेनगर वस्तीमधील रहिवाशांना अन्यत्र हलविण्यात आले. लहान मुलांसह, वृद्ध, तसेच दमेकरी या धुराने मेटाकुटीला आले होते. अग्निशमन दलाच्या नऊ बंबांनी आग विझविण्यासाठी धाव घेतली मात्र वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग विझविण्यात अडथळे येत होते.

‘आग लागल्यानंतर काळा धूर हवेत पसरला. काही कळायचा आत हा धूर घरामध्ये हवेच्या झोताने घुसला. खिडक्या, दारे बंद केली तरी घरभर धूर पसरला होता. गुदमरल्यासारखे वाटत होते, असे आधारवाडी येथील रहिवासी अस्मिता साने यांनी सांगितले. याच भागातील रहिवासी अ‍ॅड्. शांताराम दातार यांनी, असा धूर सहन करीत आम्ही स्मार्ट सिटीचे स्वप्न पाहायचे का, असा उपरोधिक प्रश्न केला. ही कचराभूमी बंद करण्याबाबत प्रशासन निष्क्रिय आहे. ही बाब आपण येत्या सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणणार आहोत, असे याचिकाकर्ते कौस्तुभ गोखले यांनी सांगितले.

आगीचे नेमके कारण कोणीही सांगत नसले तरी कचऱ्याच्या ठिकाणी तयार होणारा मिथेन वायू हेच आगीचे कारण असण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2016 3:47 am

Web Title: fire at kalyan waste land
Next Stories
1 वसईत स्लॅब कोसळून २५ प्रवासी नाल्यात
2 पोलीस शिपायाचे अपहरण
3 सामान्यांच्या ताटातील कोशिंबीर महाग
Just Now!
X