नालासोपारा पूर्वेतील पेल्हार जाबरपाडा येथे शनिवारी संध्याकाळच्या सुमारास थर्माकोलच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या लागलेल्या आगीत कोणतीही जिवीतहानी झाली नसून मोठ्या प्रमाणात सामान जळून खाक झाले आहे.

संध्याकाळी पाच वाजल्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडल्यामुळे परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेत घटनास्थळी येऊन आगीवर नियंत्रण मिळवण्यास सुरुवात केली. सुरवातीला बाजूला असलेल्या लाकडाला आग लागली होती ही आग पसरून त्याच्या जवळच असलेल्या थर्माकोलला लागल्याने आगीने जास्त पेट घेतला. थर्माकोलमुळे लागलेल्या आगीची तीव्रता अधिक असल्यामुळे त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी वेळ लागत असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली. आजच्यात दिवशी सकाळी वसई पूर्वेतील गावराईपाडा कोटिंगचे काम सुरू असलेल्या कंपनीत आग लागल्याची घटना घडली होती.