उत्तन कचराभूमीवर वारंवार आग लागल्याने पालिकेचा अभिनव प्रयोग

उत्तन येथील उघडय़ावर साठविण्यात येणाऱ्या कचऱ्याला वारंवार आग लागत असल्याने आता त्यावर मातीचा थर अंथरण्यात येणार आहे. याशिवाय या जागेची सुरक्षा करण्यासाठी चोवीस तास सुरक्षारक्षक तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कचऱ्याला वारंवार आग लागून उत्तन परिसरातल्या रहिवाशांना मनस्ताप सोसावा लागत असल्याने आमदार मुझफ्फर हुसेन यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी आयुक्त अच्युत हांगे यांची भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

उत्तन येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प गेल्या दोन वर्षांपासून बंद असल्याने प्रकल्पाबाहेर उघडय़ावरच कचरा साठवला जात आहे. कचऱ्यातून निघणाऱ्या मिथेन या विषारी वायूला वारंवार आग लागत असल्याने प्रचंड धूर निर्माण होतो. हा धूर आसपासच्या गावात पसरून रहिवाशांना चक्कर येणे, डोळे चुरचुरणे, डोकेदुखी आदी त्रास होत असतो. या समस्येवर पालिकेने तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी या वेळी केली. घनकचरा व्यवस्थापन कायद्यानुसार प्रशासनाने कचरा विल्हेवाटीबाबत काय उपाययोजना कराव्यात हे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. परंतु त्याची अंमलबजावणी प्रशासन करीत नसल्यानेच ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप हुसेन यांनी या वेळी केला. कचऱ्याला लागणाऱ्याला आगीला प्रतिबंध करायचा असेल तर त्यावर मातीचा थर देणे आवश्यक आहे. मुंबईतील देवनार कचराभूमीतही ही उपाययोजना करण्यात आली आहे. त्यामुळे पालिकेने तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेऊन तातडीने कचऱ्यावर माती पसरण्यास सुरुवात करावी, अशी सूचना मुझफ्फर हुसेन यांनी या वेळी दिली. आयुक्त अच्युत हांगे यांनी ही सूचना मान्य करून येत्या आठ दिवसात कचऱ्यावर माती पसरण्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन या वेळी दिले.

सुरक्षारक्षक आणि संरक्षक भिंत

गेल्या आठवडय़ातही कचऱ्याला मोठय़ा प्रमाणावर आग लागली होती, ही आग अजूनही धुमसतच आहे. मात्र ही आग नैसर्गिकरीत्या लागली नसून जाणूनबुजून लावण्यात आल्याचा दावा प्रशासनाने केला होता. चार ते पाच अज्ञात इसमांनी ही आग लावल्याचे पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाहिल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी या ठिकाणी २४ तास सुरक्षारक्षक नेमण्याचा तसेच संपूर्ण जागेला संरक्षक भिंत बांधण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला.

स्थलांतराचे काम रखडले

उत्तन येथील कचरा प्रकल्प वसई तालुक्यातील सकवार याठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु स्थानिक ग्रामपंचायतीने प्रकल्पाविरोधात ठराव केल्याने स्थलांतराचे काम रखडले आहे. मात्र हा निर्णय केवळ राजकीय  हेतूने प्रेरित असल्याचा आरोप मुझफ्फर हुसेन यांनी केला. प्रकल्पाच्या आसपास आठ किलोमीटर परिसरात मानवी वस्ती नाही ही वस्तुस्थिती शासनाला समजावून देण्याची गरज असून पालिकेने तसे प्रयत्न करावेत, अशी सूचना हुसेन यांनी या वेळी केली. पालिकेने प्रतिबंधात्मक उपाययोजना केली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असे हुसेन म्हणाले.