आग लागल्यानंतर ते तात्काळ विझवणारे ‘फायर बॉल’ आता वसई-विरार महापालिकेतील कार्यालयांमध्ये लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा फायर बॉल आग लागताच आपोआप फुटतो आणि त्याच्यातील विशिष्ट प्रकारच्या पावडरमुळे आग आटोक्यात आणली जाते. प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या ५० ठिकाणी असे फायर बॉल लावण्याचा निर्णय अग्निशमन विभागाने घेतला आहे.
घरातील व्यक्तींच्या अनुपस्थित आग लागली तर ती रौद्ररूप धारण करते. अशा प्रकारची आग विझवण्यासाठी ‘फायर एक्स्टिंग्युशिअर बॉल’ अर्थात अग्निशमन चेंडू तयार करण्यात आला आहे. ज्या ठिकाणी आग लावण्याची शक्यता असते, तिथे हा अग्निशमन चेंडू ठेवायचा. आग लागली आणि तापमान ८० डिग्री झाले की आपोआप हा अग्निशमन चेंडू फुटतो आणि आतील विशिष्ट पावडर पसरून ती आग विझवली जाते. वसई-विरार महापालिकेने या अग्निशमन चेंडूचे प्रात्यक्षिक पाहिल्यानंतर पालिकेच्या आस्थापनांसाठी तो वापरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रायोगिक तत्त्वावर पालिकेच्या सर्व प्रभाग समित्यांची कार्यालये, आयुक्तांसह सर्व अधिकाऱ्यांच्या दालनात हा अग्निशमन चेंडू वापरला जाणार आहे.
आग लागल्यावर त्याची सूचना देण्यासाठी ज्या प्रकारे फायर अलार्म असतो, त्याच प्रकारे फायर बॉल हे नवीन तंत्र आहे. घरगुती आणि कार्यालयीन वापरासाठी हे फायर बॉल अत्यंत सोयीचे आहे. त्यामुळे पालिकेच्या विविध आस्थापनांसाठी ते मागवण्याचा निर्णय घेतला आहे.
– भरत गुप्ता, अग्निशमन विभागाचे प्रमुख
First Published on February 14, 2018 3:38 am