बोईसरच्या मुख्य रस्त्यावर गुंदले येथे लागलेल्या भीषण आगीत २० फर्निचर गोडाऊन जळून खाक झाली आहेत. सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीने मोठ्या प्रमाणात भडका उडाला. आगीने रौद्र रुप धारण केल्याने परिसरातील फर्निचर गोडाऊन्स व दुकाने या आगीत जळाली आहेत.

मुख्य रस्त्याच्या कडेला बेकायदेशीरपणे ही गोडाऊन आणि दुकानं उभी करण्यात आली होती. एकूण २० गोडाऊनमध्ये फर्निचर तयार करुन विकलं जात होतं. याठिकाणी आगीपासून संरक्षण करण्यासाठी कोणतीही व्यवस्था नव्हती. पहाटे कामगार गाढ झोपेत असताना अचानक आगीचा भडका उडाला.

आग लागल्याचं दिसताच कामगारांनी तिथून पळ काढला. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने आग फैलावत गेली आणि आसपास असणारी २० दुकानंही जळून खाक झाली. या आगीत लाखोंचे नुकसान झालं आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. अतीउच्च दाबाच्या विद्युत वाहिनीमुळे आग लागली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.