भाईंदर : अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या अग्निशमन दलातील ठेकेतत्त्वावर ठेवण्यात आलेल्या ७० कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून पगार देण्यात आला नसल्याचे समोर आले आहे.

मीरा-भाईंदर महापालिकेतच्या पालिका हद्दीत चार फायर स्टेशन असून यात ७० हून अधिक कामगार ठेका मदतनीस म्हणून रात्रंदिवस काम करीत आहेत. शहरात करोना रुग्णांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ होत असल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. अशा भीषण परिस्थितीत अग्निशमन दलातील कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता २४ तास सेवा देत आहेत. परंतु अग्निशमन दलाच्या जवानांना गेल्या चार महिन्यांपासून पगार मिळालेला नाही आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाची उपजीविका भागवणे कठीण झाले आहे. शिवाय मुख्य अग्निशमन दल अधिकारी आणि विभागीय उपायुक्तांना करोनाची लागण झाल्यामुळे आता या संबंधी तक्रारदेखील कोणाला करावी असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडला आहे.