कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचा अग्निशमन विभाग पावसाळी परिस्थितीत वारंवार येणाऱ्या आपत्तींमुळे अत्यवस्थ ठरु लागला आहे. अपुरी सामुग्री तसेच मनुष्टबळाचा अभाव यामुळे रोज येणारे आव्हान पेलताना या विभागातील कर्मचाऱ्यांच्या अक्षरश नाकीनऊ आले आहेत. बदलापूरात गेल्या काही वर्षांमध्ये उंच इमारतींची संख्या वाढली आहे. असताना उंच मजल्यांवर आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा सामना करण्यासाठी पुरेशी यंत्रणा उपलब्ध नसल्याचे स्पष्ट होत आहे.
कुळगाव-बदलापूर नगरपालिकेतील अग्निशमन विभागाकडे पावसाळ्यात आपत्ती नियोजनाची जबाबदारी देण्यात आली असून या पथकातील अधिकारी व कर्मचारी सध्या जोमाने काम करत आहेत. गेल्या आठवडय़ात या पथकाने वादळी वाऱ्यात शहरात पडलेली जवळपास पावणेदोनशे झाडे उचलून व छाटून वेगळी केली आहेत.  या विभागात ९ कर्मचारीच असून शहराच्या लोकसंख्येचा विचार करता यापेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे.   पावसाळी आपत्तीचे नियोजन करण्यासाठी या विभागाकडे दोन इंजिनच्या बोटी, १ रबर बोट त्याशिवाय ३५ लाइफ जॅकेट, २० एअर टय़ूब, १५ लाइफ रिंग, झाडे कापण्याची दोन यंत्रे, तसेच दोरखंड व बचावासाठी लागणारे इतर साहित्य उपलब्ध आहे. ही सामुग्री पुरेशी नाही अशा तक्रारी सातत्याने पुढे येत आहेत.

विभागावर वाढता भार
या अग्निशमन केंद्रावर संपूर्ण शहराबरोबरच बदलापुरातील मोठय़ा औद्योगिक क्षेत्राची जबाबदारी असून येथे लागणाऱ्या आगीच्या घटनांपासून शहरातील आग व पावसाळी आपत्तींचेही नियोजन सोपविण्यात आले आहे. यात धबधब्यांवर अडकणारे पर्यटक, मृतदेहांची विल्हेवाट तसेच पडलेली झाडे हटविण्यापासून तोडण्यापर्यंतचे काम याच कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे. या भाराचा विचार करता कर्मचारी व अधिक यंत्रणा या विभागाकडे असणे आवश्यक आहे.

नियमानुसार सध्याची गरज
’ किमान ६१ कर्मचारी
’ सध्या असलेल्या एक आगनियंत्रण गाडीसोबत अजून एक आगनियंत्रण गाडी व २ छोटय़ा आगनियंत्रण गाडय़ा
’ १२००० लिटरच्या टँकरची गरज
’ १ रेस्क्यू व्हॅन व १ फायर जिप
’ आपात्कालीन संपर्कासाठी १ वायरलेस गाडी

नव्या सामग्रीसाठी आम्ही प्रस्ताव तयार करत असून त्यात नव्या अद्ययावत यंत्रणेचा समावेश करण्यात येणार आहे. सध्या सात मजली इमारतीसाठीची आमच्याकडे सोय असली तरी, बारा मजली इमारत झाल्यास त्यासाठी उंच शिडीची आवश्यकता भासणार आहे. याबाबत माहिती घेऊनच ही शिडी व अन्य सामग्री घेणार आहोत.
-देविदास पवार,
पालिकेचे मुख्याधिकारी