अग्निशमन दलाच्या ताफ्यात अद्ययावत मानवरहित वाहन; दाटीवाटीच्या जागी जाण्याची क्षमता

आग विझवताना अनेकदा अग्निशमन दलाच्या जवानांना जीव धोक्यात घालावा लागतो. अनेकदा आग एवढी मोठी असते की जवानांना पुढे जाता येत नाही. यासाठी महापालिकेतर्फे आपल्या ताफ्यात रिमोटवर चालणारे अद्ययावत अग्निशमन वाहन आणले जाणार आहे. हे मानवरहित वाहन रिमोट यंत्राच्या साहाय्याने चालणार असून आग शोधून स्वयंचलित पद्धतीने विझवली जाणार आहे.

दाटीवाटीने वाढलेल्या शहरात अग्निधोका सर्वात मोठा असतो. आग लागल्यावर ती विझवताना अग्निशमन दलाचे जवान जिवाची बाजी लावत असतात. उंच टॉवर किंवा दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतीत आग विझवणे मोठे आव्हान असते. आगीच्या ज्वाळा एवढय़ा तीव्र असतात की, तिथे जाणे धोक्याचे असते. त्यामुळे महापालिकेने आपल्या ताफ्यात ‘वॉटर टॉवर विथ मॉनिटर’ हे वाहन आणण्याचा निर्णय घेतला आहे. मानवरहित वाहन आणि स्वयंचिलत आग शोधून ती विझवण्याची यंत्रणा असे त्याचे स्वरूप आहे, अशी माहिती अग्निशमन विभागाचे प्रमुख भरत गुप्ता यांनी दिली. अशी यंत्रणा फक्त नाशिक महापालिकेकडे आहे. पुढील आठवडय़ात या वाहन खरेदीच्या निविदा काढल्या जाणार आहेत, असेही गुप्ता यांनी सांगितले.

वैशिष्टय़े

  • या वाहनात अद्ययावत यंत्रणा असून हे वाहन रिमोटच्या साहाय्याने १०० मीटपर्यंत नियंत्रित करता येते.
  • या वाहनात १५ मीटरचा बूम आहे. ज्याची क्षमता ६५ मीटपर्यंत म्हणजे २२ मजल्यापर्यंत आग विझवण्याची आहे.
  • या वाहनाची किंमत सुमारे अडीच कोटी रुपये आहे.

चार नवी अत्याधुनिक अग्निशमन वाहने

पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या ताफ्यात ४ नवे अत्याधुनिक फायर टेंडर (अग्निशमन वाहने) दाखल झाली आहेत. ज्या ठिकाणी आग लागते तेथील विद्युतपुरवठा बंद होतो. अंधार झाल्याने अग्निशमन दलाला आग विझवण्यात अडथळा येतो. या वाहनात हायमास्क लाइट असून स्वतंत्र जनरेटरची व्यवस्था आहे. वाहनात डिजिटल पॅनल यंत्रणा बसविण्यात आली आहे. ज्यामुळे किती पाणी शिल्लक आहे, त्याची माहिती चालकाला मिळेल आणि पुढचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. यापूर्वी पालिकेच्या अग्निशमन विभागाकडे १६ फायर टेंडर होते. या ४ नव्या गाडय़ांमुळे एकूण संख्या २० झाली आहे. याशिवाय पालिकेच्या अग्निशमन मोटार सायकलीदेखील कार्यरत आहेत.