पालिकेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; करोना रुग्णालयालाही फटका

ठाणे : येथील वाघबीळ परिसरातील दिया मल्टी स्पेशालिटी या कोविड रुग्णालयातील औषधालयामध्ये मंगळवारी रात्री किरकोळ आग लागून सर्वत्र धूर पसरला. मात्र, महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन आग विझविली आणि त्याचबरोबर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या चार रुग्णांना तातडीने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात हलविले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

ठाणे येथील वाघबीळ परिसरातील एका वाणिज्य इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर दिया मल्टी स्पेशालिटी रुग्णालय आहे. अतिदक्षता विभागासह २० खाटांचे हे रुग्णालय आहे. या रुग्णालयामध्येच दिया औषधालय आहे. मंगळवारी रात्री या औषधालयामध्ये किरकोळ आग लागून रुग्णालयात सर्वत्र धूर पसरला. या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात चार करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू होते. या घटनेची माहिती मिळताच ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांच्या पथकाने आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आग लागल्यानंतर पथकाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात येतो. मात्र, रुग्णालयाचा वीजपुरवठा खंडित केला तर अतिदक्षता विभागातील यंत्रणा ठप्प होऊन त्याचा त्रास रुग्णांना होण्याची भीती होती. त्यामुळे अग्निशमन दलाने एकीकडे रुग्णालयातील आग विझविण्याचे काम सुरू होते तर दुसरीकडे आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून दुसरीकडे हलविण्याचे काम सुरू केले. आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख संतोष कदम यांनी महापालिकेचे डॉ. अनिरुद्ध माळगावकर यांच्याशी संपर्क साधून बाळकुममधील कोविड रुग्णालयामध्ये रुग्णांसाठी चार खाटा आरक्षित केल्या होत्या. मात्र, संबंधित रुग्णालयाचे डॉ. प्रमोद जाधव यांनी पालिका रुग्णालयाऐवजी रुग्णांना त्यांच्याच मुंबईतील रुग्णालयात हलविण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या पथकाने या रुग्णांना रुग्णवाहिकेच्या माध्यमातून भांडुपमधील भाठिया रुग्णालयात हलविले. आग विझविण्याबरोबरच रुग्णांना तात्काळ दुसऱ्या ठिकाणी हलविल्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. औषधालयाच्या वातानुकूलित यंत्रणामध्ये शॉर्टसर्किट होऊन ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज पालिकेने वर्तविला आहे.