भिवंडीतील कासिमपुरा भागातील कपड्यांच्या कारखान्याला मंगळवारी सकाळी भीषण आग लागली. अग्निशामक दलाने तातडीने आग विझवण्याचे प्रयत्न केल्यामुळे सकाळी सव्वा दहाच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. कारखान्याच्या वरच्या मजल्यांवर अनेक रहिवासी राहत असल्यामुळे त्यांनाही युद्धपातळीवर प्रयत्न करून इमारतीतून बाहेर काढण्यात येत आहे.
उंच क्रेनच्या साह्याने अनेकांना बाहेर काढण्यात आले असून, उर्वरित लोकांनाही बाहेर काढण्यात येत आहे. प्राथमिक माहितीनुसार सुमारे १५० लोक या ठिकाणी अडकले होते. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास कारखान्याला आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले आहे.
कासिमपुरा भागात राहत मंझिल ही चार मजली इमारत आहे. याच इमारतीच्या तळमजल्यावर मंगळवारी सकाळी आग लागली. इमारतीच्या वरच्या मजल्यांवर ६६ सदनिका असून, तिथे कुटुंबे राहत आहेत. आग लागल्याचे समजल्यावर सर्व रहिवासी थेट इमारतीच्या छताकडे धावली. आगीचे वृत्त समजल्यावर अग्निशामक दलाचे सहा बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग विझवण्यास सुरुवात केली. त्यानंतर महापालिकेच्या क्रेनच्या साह्याने छतावरील लोकांना इमारतीच्या खाली आणण्यात येऊ लागले. छतावरील महिलांना खाली आणण्यात आले असून, उर्वरित लोकांनाही इमारतीच्या खाली आणण्यात येते आहे.